उस्मानाबाद /प्रतिनिधी-कळंब तालुक्यातील शिराढोण येथील हिंदू-मुस्लीम बांधवांचे श्रद्धास्थान हजरत सय्यद ख्वाजा नसिरोद्दीन रहे यांच्या उरुसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात 71 जणांनी रक्तदान केले. उरुस कमिटी आणि उस्मानाबाद येथील अंजुमन हेल्थकेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन शिराढोण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उरुस कमिटीचे अध्यक्ष समीयोद्दीन काझी, उपाध्यक्ष बिलाल पठाण, सचिव एजाज डांगे, कार्याध्यक्ष वसीम पठाण, अंजुमन हेल्थकेअर सोसायटीचे अध्यक्ष फेरोज पल्ला, चंद्रकांत महाजन, अज्जू शेख, साजिद शेख,  अयुब कुरेशी, मुन्ना जहागीरदार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनानंतर सहायक पोलीस निरीक्षक गुरमे यांनी रक्तदानामुळे अनेक गरजू रूग्णांचे जीव वाचविण्यास मदत होते, असे सांगून जास्तीत जास्त बांधवांनी शिबिरात रक्तदान करण्याचे आवाहन केले.  या शिबिरात सर्व जाती-धर्मातील बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान केेले. 
रक्तसंकलन करण्यासाठी सह्याद्री ब्लड बँकेच्या चमूने सहकार्य केले. तर शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिराढोण पोलीस ठाण्याचे कर्मचारी, उरुस कमिटीचे पदाधिकारी व सदस्य तसेच अंजुमन हेल्थकेअर सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले. 
 
Top