उस्मानाबाद/प्रतिनिधी-डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपपरिसराचे शैक्षणिक विकासात मोठे योगदान आहे, या उपपरिसराचे स्वतंत्र विद्यापीठात व्हावे यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही मा.खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपपरिसराचा १५ वा वर्धापन दिन शुक्रवारी (दि.१६) साजरा झाला. मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी समारंभाचे अध्यक्षस्थान भुषविले. यावेळी  प्रख्यात सर्जन, समाजसेवक मा.डॉ.दामोधर बळीराम पतंगे यांना ‘जीवन साधना पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास प्रकुलगुरु डॉ.प्रविण वक्ते, कुलसचिव डॉ.साधना पांडे, ज्येष्ठ व्यवस्थापन परिषद सदस्य संजयमामा निंबाळकर, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, वित्त व लेखाधिकारी राजेंद्र मडके, संचालक डॉ.अनार साळुंके,  माजी उपाध्यक्ष संजय दुधगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्राचार्य डॉ.हरिदास विधाते, डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.अशोक देशमाने, प्राचार्य डॉ.अशोक मोहेकर, डॉ.गोविंद काळे, प्रा.संभाजी भोसले, डॉ.सुलभा देशमुख, डॉ.रमेश दापके, उपकुलसचिव आय.आर.मंझा आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले, उस्मानाबाद जिल्हयासह मराठवाडयात आजही दुष्काळी परिस्थिती आहे. विद्याथ्र्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे मात्र त्यांना पायाभूत सुविधा व उच्च दर्जाचे तंत्र उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. उपपरिसराचे रुपातंतर स्वतंत्र विद्यापीठात व्हावे, अशी भावनाही खा.राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केली. 
    उपपरिसराच्या विकासाठी कटिबध्द : मा.कुलगुरु
    गेल्या १५ वर्षांपासून विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपपरिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न होत आहे. यावेळी १४ कोटी ८५ लाखांची भरीव तरतूद करण्यात आली असून विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी ग्वाही ही मा.कुलगुरु यांनी दिली.
  पुरस्काराचा विन्रमपणे स्विकार : डॉ.पतंगे
    आयुष्याची ६० वर्षे रुग्ण, वृध्द व समाजसेवेसाठी काम केलं. या हजारो जणांच्यावतीने मी हा पुरस्कार विनम्रपणे स्विकारतो, अशी भावना डॉ.दामोधर पतंगे यांनी मांडली. आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत समाजासाठी कार्यरत राहु, असा शब्दही त्यांनी दिला. यावेळी संजय निंबाळकर व प्रा.संभाजी भोसले यांनी उपपरिसरासाठी तळमळीची भावना मांडली. डॉ.अनार साळुंके यांनी प्रास्ताविक  तर डॉ.महेश्वर कळलावे यांनी मानपत्राचे वाचन केले. सुत्रसंचालन जनसंपर्क  अधिकारी संजय शिंदे यांनी तर आभार डॉ.साधना पांडे यांनी मानले. यावेळी माजी अधिसभा सदस्य नितीन बागल, चंद्रजित जाधव, डॉ.सतीश शेळके, विद्याधर गुरव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यासाठी दहा समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. 
 
Top