तुळजापूर (प्रतिनिधी)-  यंदाच्या शारदीय नवरात्र महोत्सवात दुष्काळी परिस्थिती आणि भाविकांची प्रचंड गर्दी ही मोठी आव्हाने होती. मात्र, सर्व अधिकारी, कर्मचारी, विविध विभाग आणि संस्थांच्या सांघिक सहभागामुळे तसेच देवी आणि भाविकांना केंद्रबिंदू मानून सर्वांनी केलेल्या कामामुळे हा महोत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पडला. याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो, अशी कृतज्ञता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किरण पुजार यांनी व्यक्त केली.

श्री तुळजाभवानी देवींचा शारदीय नवरात्र महोत्सव यशस्वीपणे संपन्न झाल्यानिमित्त गुरुवार, दि. 5 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर येथे यात्रा कालावधीत विशेष परिश्रम घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी किरण पुजार बोलत होते. या शक्तिपीठात भविष्यातही मोठ्या संख्येने भाविक यावेत आणि त्यांना अधिक चांगल्या सुविधा व सेवा देता याव्यात, यासाठी आई तुळजाभवानीने आम्हाला आवश्यक क्षमता आणि शक्ती द्यावी, अशी प्रार्थनाही त्यांनी देवीचरणी केली. यावेळी प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार माया माने यांनीही नवरात्र महोत्सव यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे यंदाचा शारदीय नवरात्र महोत्सव यशस्वीपणे पार पडल्याचे त्यांनी नमूद केले. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.  या कार्यक्रमास अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top