वाशी (प्रतिनिधी)-  तालुक्यातील पारगाव व परिसरातील प्रवाशांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एसटी बससेवेच्या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पारगाव दौऱ्यादरम्यान दिलेल्या आदेशाची अवघ्या आठ तासांत अंमलबजावणी करण्यात आली. त्यानुसार पारगाव येथे कायमस्वरूपी एसटी नियंत्रण कक्ष सुरू करून अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

या प्रश्नासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून ॲड. महेश महादेवराव आखाडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. मंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान सुदर्शन नारटा यांनी ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन सादर केले. त्याची तातडीने दखल घेत मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले. विशेष म्हणजे अवघ्या आठ तासांत आदेशाची अंमलबजावणी झाली. नियंत्रण कक्ष सुरू झाल्यानंतर ॲड. महेश आखाडे, सुदर्शन नारटा व ग्रामस्थांच्या वतीने नूतन कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेनेच्या माजी सभापती बायसाबाई पोणफुले यांच्या हस्ते श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी पोलीस पाटील अमर आखाडे, महादू दादा मलेगंनेर, दीपक आखाडे, चेतन तातुडे, बबलू खोड, बाबासाहेब हारे, बाबू डोके, सुमन कुलकर्णी, रामभाऊ भैरट, बाळासाहेब कुलकर्णी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारगावच्या एसटी सेवेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ॲड. महेश महादेवराव आखाडे, सुदर्शन नारटा, सारंग तात्या मोटे, प्रवीण डोके सर, महादू दादा मलेगंनेर, कुणाल चव्हाण व समस्त ग्रामस्थांनी सातत्याने प्रयत्न केले. अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आभार मानले.

 
Top