धाराशिव (प्रतिनिधी)- कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.या योजनेतून आज,4 नोव्हेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील आणखी 18 हजार 559 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर तब्बल 207 कोटी 43 लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.या योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 68 हजार 353 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर 664 कोटी 61 लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे.
राज्यभरातही कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला गती मिळाली असून,4 नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी 4 लाख 87 हजार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर सुमारे 4 हजार 764 कोटी 44 लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील सुमारे 20 लाख 72 हजार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर एकूण 18 हजार 40 कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर योजनेच्या अंमलबजावणीला गती
राज्यातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्याच्या उद्देशाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 राबविण्यात येत आहे.या योजनेला 2 जून 2026 रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.त्यानंतर 15 जुलै 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये योजनेच्या काही निकषांमध्ये अंशतः सुधारणा करण्यात आली आहे.
या योजनेतील कर्जमुक्ती आणि एकवेळ समझोता (ओटीएस) या घटकांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील 30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,12 राष्ट्रीयीकृत बँका तसेच इतर खासगी बँकांसह एकूण 53 बँकांनी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या सुमारे 32 लाख कर्जखात्यांची माहिती महा-आयटीमार्फत विकसित करण्यात आलेल्या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केली आहे.यामध्ये जिल्ह्यातील 97 हजार 295 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील 70 हजार 629 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण
योजनेच्या निर्धारित निकषांनुसार पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी राज्यातील सुमारे 25 लाख 83 हजार लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.यापैकी 4 नोव्हेंबर 2026 अखेर राज्यातील 20 लाख 72 हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील सुमारे 83 हजार 931 थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यापैकी आतापर्यंत 70 हजार 629 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.प्रसिद्ध यादीतील उर्वरित शेतकऱ्यांनीही ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 4 हजार 732 शेतकऱ्यांनाही लाभ
4 नोव्हेंबर 2026 अखेर जिल्ह्यातील 68 हजार 353 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर 664 कोटी 61 लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. यामध्ये धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 4 हजार 732 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर जमा करण्यात आलेल्या 29 कोटी 66 लाख रुपयांचाही समावेश आहे.
आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर कर्जमाफीची रक्कम ऑनलाइन पोर्टलद्वारे थेट जमा करण्यात येत आहे. त्यामुळे योजनेच्या लाभाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर पोहोचण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आवश्यक आर्थिक पाठबळ उपलब्ध व्हावे,यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीककर्जाचे वाटप करण्याबाबत सर्व संबंधित बँकांना शासनामार्फत निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून,आगामी हंगामातील शेतीच्या नियोजनासाठी आर्थिक आधार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
उर्वरित शेतकऱ्यांची सहावी यादी लवकरच प्रसिद्ध होणार
कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्व याद्यांमधील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही,त्यांनी कोणताही विलंब न करता ही प्रक्रिया पूर्ण करावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर संबंधित पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर शासनाकडून कर्जमाफीच्या लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे.तसेच योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांची सहावी यादी शासनाकडून लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी केवळ आधार प्रमाणीकरणाअभावी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये,यासाठी प्रसिद्ध याद्यांमधील उर्वरित शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.