धाराशिव (प्रतिनिधी)- दिवाळी म्हणजे आनंदाचा,प्रकाशाचा आणि माणुसकीची नाती अधिक दृढ करण्याचा सण.मात्र,समाजाच्या मुख्य प्रवाहापासून पिढ्यानपिढ्या दूर राहिलेल्या अनेक कुटुंबांच्या आयुष्यात आजही मूलभूत सुविधांचा अभाव आणि उदरनिर्वाहाच्या संघर्षाचा अंधार कायम आहे. अशा परिस्थितीत कळंब तालुक्यातील पानगाव येथील पारधी वस्तीवर दिवाळीच्या निमित्ताने एक वेगळाच अनुभव पाहायला मिळाला.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी थेट पारधी वस्तीवर पोहोचून तेथील नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या समस्या आपुलकीने जाणून घेतल्या.
दिवाळीच्या मंगल पर्वावर जिल्हाधिकारी पुजार यांनी पानगाव येथील पारधी वस्तीला भेट दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर उपस्थित होते.समाजाच्या मुख्य प्रवाहापासून पिढ्यानपिढ्या दूर राहिलेल्या पारधी बांधवांची दिवाळी गोड व्हावी,त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेता याव्यात आणि प्रशासनाचा आधार त्यांच्यापर्यंत पोहोचावा,या भावनेतून ही भेट महत्त्वपूर्ण ठरली. जिल्हाधिकारी पुजार यांनी वस्तीवरील नागरिकांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. त्यांच्या राहणीमानाची, दैनंदिन खाण्यापिण्याच्या व्यवस्थेची आणि उपजीविकेसाठी कराव्या लागणाऱ्या कामांची सविस्तर माहिती घेतली. त्यांच्या अडचणी समजून घेताना प्रत्येकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. यावेळी पारधी समाजातील बांधवांनी आपल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
जिल्हाधिकारी पुजार यांनी नागरिकांच्या सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या. हक्काच्या जागेचा प्रश्न,पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि उपजीविकेच्या साधनांची उपलब्धता या सर्व बाबींवर योग्य ती कार्यवाही करून समस्यांचे तातडीने निवारण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या भेटीतील आणखी एक महत्त्वाचा क्षण म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तीवरील लहान मुलांशी साधलेला मनमोकळा संवाद.मुलांशी आपुलकीने बोलताना त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. दिवाळीच्या निमित्ताने प्रशासनाच्या वतीने पारधी वस्तीवरील नागरिकांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.लहान मुलांना फटाकेही देण्यात आले. त्यामुळे वस्तीवरील चिमुकल्यांच्या आनंदात भर पडली.
