धाराशिव (प्रतिनिधी)-  दिवाळीच्या सणाचा आनंदोत्सव सुरू असतानाच धाराशिव तालुक्यातील येडशी गावात काळजाचा थरकाप उडवणारी दुर्दैवी घटना घडली. सोमवार दि. 9 नोव्हेंबरच्या पहाटे 2.40 मिनिटांनी येथील करंडे किराणा व गिफ्ट सेंटर या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील दोघाजणांचा होळपळून तर चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे येडशी गावासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दिवाळीच्या सणात घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. या भीषण दुर्घटनेत उत्तम त्रिंबक करंडे (75), चंद्रकला उत्तम करंडे (70), गोविंद उत्तम करंडे (47), ज्योती गोविंद करंडे (42), गायत्री गोविंद करंडे (16) आणि सिद्धी गोविंद करंडे (15) या एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर मुलगा कृष्णा गोविंद करंडे याला गर्मीचा त्रास होवू लागल्यामुळे तो घरातून बाहेर आल्यामुळे तो वाचला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, दिवाळीनिमित्त घरात आणि किराणा दुकानात पणत्या लावण्यात आल्या होत्या. याच पणत्यांमुळे दुकानाला आग लागली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. किराणा दुकानात मोठ्या प्रमाणात विविध वस्तू आणि ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले असण्याची शक्यता आहे. आगीतून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाल्याने परिसरात धुराचे लोट पसरले. या धुरामुळे गुदमरून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघांचा जळून मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे गोविंद करंडे व ज्योती करंडे किरकोळ आग लागल्याचे समजून घरातून बाहेर आले होते. परंतू त्यांच्या दोन्ही मुली घरातच झोपल्याचे लक्षात आल्यानंतर गोविंद व ज्योती मुलींला आणण्यासाठी दुसऱ्या मजल्यावर जात असतानाच अचानक अगीने रोद्र रूप धारण केल्यामुळे त्यांचा जळून मृत्यू झाला. तर उत्तम त्रिंबक करंडे, चंद्रकला उत्तम करंडे, गायत्री गोविंद करंडे आणि सिद्धी गोविंद करंडे यांचा गुदमरून मृत्यू झाला. विशेष म्हणजे धाराशिव नगर परिषदेच्या अग्निशमन दलास माहिती देवून देखील दोन तास उशिरा गाडी आली. यावेळेस अग्निशमन दलाच्या गाडीमध्ये पाणी व डिझेल आपुरे असल्यामुळे व ऑक्सीजन मास्क नसल्यामुळे करंडे परिवारातील गुदमरलेल्या व्यक्तींचे प्राण वाचवता आले नाहीत. 

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी आणि अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस पथकही घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी तसेच बचावकार्य करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत सहाही जणांचा मृत्यू झाल्याने मदतकार्य करणाऱ्या नागरिकांनाही मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच आमदार राणाजगजितसिंह पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रतापसिंह पाटील घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. मदतकार्याची माहिती घेत संबंधित यंत्रणांशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांकडून घटनेची माहिती संकलित करण्यासह पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आगीचे नेमके कारण काय, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जाणार आहे.

 
Top