धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी सण-उत्सव,जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांसाठी होणारी संभाव्य आंदोलने तसेच शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलनांची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 6 ते 19 नोव्हेंबर 2026 या कालावधीत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.अपर जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये हे आदेश जारी केले आहेत.
5 ते 11 नोव्हेंबरदरम्यान दिवाळी सण आणि 15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा जयंती साजरी होणार आहे.या काळात बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे.तसेच जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे दिवाळी अनुदान,पीक अनुदान,पीक विमा, पाणी व चारा उपलब्ध करून देण्याच्या मागण्यांसाठी विविध संघटना व राजकीय पक्षांकडून धरणे,मोर्चे,उपोषणे,रास्ता रोको, बंद,निदर्शने तसेच आत्मदहनाचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातही आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हे आदेश लागू करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार शासकीय कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना शस्त्रे,तलवारी, बंदुका,लाठ्या,काठ्या,सोटे तसेच शारीरिक इजा पोहोचवू शकणाऱ्या वस्तू जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.दाहक पदार्थ,स्फोटके,दगड किंवा फेकण्यासाठी वापरण्यात येणारी साधने बाळगणे अथवा जमा करून ठेवण्यासही प्रतिबंध राहणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक भाषणे करणे,आक्षेपार्ह घोषणा देणे,असभ्य वर्तन करणे, विडंबनात्मक नकला करणे तसेच सामाजिक सलोखा,सार्वजनिक सुरक्षितता,देशाची सार्वभौमता व संविधानातील मूल्यांना बाधा पोहोचवणाऱ्या कृती करण्यास मनाई आहे.आक्षेपार्ह चित्रे, निशाण्या, घोषणाफलक बाळगणे तसेच व्यक्ती,मृतदेह,आकृती किंवा त्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.
पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यासाठी परवानगी आवश्यक
या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना विनापरवानगी एकत्र येता येणार नाही.तसेच मोर्चे, मिरवणुका,सभा आणि निवडणूक प्रचारसभांसाठी पोलीस अधीक्षक,धाराशिव किंवा धाराशिव,तुळजापूर,उमरगा, कळंब व भूम येथील संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची पूर्व लेखी परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. या आदेशातून अंत्ययात्रा,धार्मिक विधी,विवाह सोहळे,सामाजिक सण,शासकीय कार्यक्रम, कर्तव्यावरील शासकीय कर्मचारी तसेच सिनेमागृहे व रंगमंच यांसारख्या सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणांना सूट देण्यात आली आहे. हे प्रतिबंधात्मक आदेश 6 नोव्हेंबर रोजी रात्री 12.01 वाजेपासून 19 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात लागू राहणार असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.