धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील इंजिनीअर अँड कॉन्ट्रॅक्टर तथा बांधकाम व्यावसायिक सुनील व्यंकटराव चव्हाण यांचे सुपुत्र कुणाल सुनील चव्हाण यांची अंतरराष्ट्रीय प्रवेश परीक्षेत अव्वल गुण घेऊन अमेरिकेतील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्स अमहर्स्ट या सार्वजनिक संशोधन विद्यापीठात MS (AI) या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. कुणाल यांच्या या यशामुळे करजखेडा गावासह तुळजापूरच्या शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कुणाल चव्हाण यांचे मूळ गाव करजखेडा असून त्यांचे वडील सुनील व्यंकटराव चव्हाण हे तुळजापूर येथे वास्तव्यास आहेत. कुणाल यांनी आपले प्राथमिक शिक्षण तुळजापूर येथे पूर्ण केल्यानंतर लातूर येथे माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर अकरावी -बारावी राजस्थानमधील कोटा येथे पूर्ण केले. वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तामिळनाडू (VIT) येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्याची माहिती आहे. आता अमेरिकेतील नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे.
जिद्द, मेहनत आणि शिक्षणाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर कुणाल यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च शिक्षणाची संधी मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोरही जागतिक स्तरावर शिक्षण घेण्याची प्रेरणादायी संधी उभी राहिली आहे. कुणाल चव्हाण यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार, नातेवाईक आणि तुळजापूरमधील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
