धाराशिव (प्रतिनिधी)- 70 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन व सम्राट अशोक विजयादशमी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धम्म रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर सजविलेल्या रथातून तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची लेझीमच्या तालात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
धाराशिव शहरातील भीम नगरमधील क्रांती मोर्चा चौकातील क्रांती स्तंभ येथे सजविलेल्या रथामध्ये तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, बांधकाम सभापती सभापती अभिजीत काकडे, पाणी पुरवठा सभापती विलास लोंढे, नगरसेवक अक्षय ढोबळे, अभिजीत दाते काकडे, अक्षय जोगदंड, पृथ्वीराज दंडनाईक, दाजीअप्पा पवार, अभिजीत पतंगे, सदानंद अकोसकर, धनंजय पाटील, राष्टवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पार्टीचे नगर परिषद गटनेते खलिफा कुरेशी, नगरसेवक अयाज शेख, अफरोज पिरजादे, नितीन भोसले, आयोजक नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे माया कपनी सामाजिक संघटनेचे बाळासाहेब बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ही धम्म रॅली क्रांती चौक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, त्रिशरण चौक, पोस्ट ऑफिस, संत गाडगेबाबा महाराज चौक मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा येथे वाजत गाजत आणि लेझीमच्या ठेक्यात दाखल झाले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात आणि बाबासाहेबानं दिलं.... कुंकू लावीलं रमानं....माझी म्हणू का..... आदींसह विविध भीम गीतांच्या तालावर सुरेख व तेवढ्याच जोशपूर्ण आणि दमदारपणे सादरीकरण करुन उपस्थितांची वाहवा मिळवली. या मुलामुलींच्या लेझीमचे उत्कृष्ट सादरीकरणच या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादनाने या रॅलीची सांगता करण्यात आली. रॅली दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार दराडे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता. याबरोबरच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सहकार्य केले. अतिशय शांततामय धम्म रॅलीमध्ये बौद्ध उपासक, उपासिका, महिला, युवक-युवती व भीम अनुयायी मोठ्या संख्येने सामील झाले होते.