भूम (प्रतिनिधी)-  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‌‘मत वाचवा, देश वाचवा' या अभियानांतर्गत आज भूम येथे तहसील कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला. मतदार यादीतील कथित अनियमितता, पारदर्शकतेचा अभाव आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यकाळातील फेरबदलांची सखोल चौकशी करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात व तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.

लोकशाहीच्या रक्षणासाठी निदर्शने

लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदार यादी हा अत्यंत महत्त्वाचा व मूलभूत आधार आहे. मात्र, अलीकडच्या काळात मतदार यादीत फेरबदल होणे, पात्र नागरिकांची नावे वगळली जाणे आणि अपात्र व्यक्तींची नावे समाविष्ट होणे यांसारख्या गंभीर बाबी समोर येत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला. निवडणूक प्रक्रियेवरील सर्वसामान्य जनतेचा विश्वास अबाधित राहावा आणि प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा घटनात्मक अधिकार सुरक्षित राहावा, यासाठी हा लढा उभारण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोर्चाच्या समाप्तीनंतर तहसीलदारांना शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. ‌‘मत वाचवा, देश वाचवा' या घोषणेसह भूम शहरात काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विलास शाळू, भूम तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.सिराज मोगल, रुपेश शेंडगे, धाराशिव एन एस यु आय चे जिल्हाध्यक्ष ॲड. मुशरफ सय्यद, समीयोदिन काझी, मोईज सय्यद, दत्ता तांबे, मोहम्मद पटेल यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top