धाराशिव (प्रतिनिधी)-  मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी सध्या भीषण दुष्काळाच्या संकटाशी झुंज देत आहेत. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि पशुधनासाठी पाण्याची उपलब्धता असे अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी आणि व्यथा जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ नेते तथा खासदार शरदचंद्रजी पवार हे 2 व 3 नोव्हेंबर रोजी मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी खासदार शरदचंद्रजी पवार हे परंडा आणि बार्शी तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. तर 3 नोव्हेंबर रोजी कळंब आणि केज येथील दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या दौऱ्यात स्थानिक शेतकरी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर भर असणार आहे. 

शेतीतून मिळणारे घटलेले उत्पन्न, डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर, वाढता उत्पादन खर्च आणि आगामी रब्बी हंगामाची अनिश्चितता यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच पशुधनासाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करणे हे पशुपालकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळग्रस्त भागात तातडीने चारा छावण्या, पिण्याच्या पाण्याचे टँकर, पीक नुकसान भरपाई, पीक विमा आणि आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. या गंभीर परिस्थितीत खासदार शरदचंद्र पवार हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

 
Top