भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील तलावांमधील पिण्याच्या पाण्याचे संरक्षण व्हावे आणि शेतीसाठी होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखला जावा, यासाठी प्रशासनाने संयुक्त कारवाई सुरू केली आहे. आरसोली येथील लघुपाटबंधारे प्रकल्पावर भरारी पथकाने कारवाई करत तीन मोटारी व पाइपलाइन जप्त केली. तसेच वांगी-जवळा तलावातून होणारा पाणी उपसा रोखण्यासाठी विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे.
भूम तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तलावांमधील उपलब्ध पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवणे आवश्यक आहे. मात्र, प्रशासनाकडून यापूर्वी सूचना देण्यात आलेल्या असतानाही काही ठिकाणी तलावांमधून पाण्याचा उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली.
आरसोली लघुपाटबंधारे प्रकल्पावर महसूल, पाटबंधारे, महावितरण आणि पोलीस विभागाच्या संयुक्त भरारी पथकाने कारवाई केली. या वेळी पाणी उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या तीन मोटारी आणि पाइपलाइन जप्त करण्यात आल्या. यापुढेही अनधिकृत पाणी उपसा आढळल्यास कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, वांगी-जवळा तलावातून होणारा पाणी उपसा रोखण्यासाठी आज विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. या तलावावर वांगी खुर्द, भूम आणि जवळा या गावांच्या पाणीपुरवठा योजना कार्यरत आहेत. त्यामुळे तलावातील पाणीसाठा या गावांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पिण्याच्या पाण्याचे संरक्षण व्हावे आणि तलावातील पाण्याचा अनधिकृत वापर होऊ नये, या उद्देशाने महसूल, पाटबंधारे, महावितरण व पोलीस विभागाच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही पाणी उपसा सुरू कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
