धाराशिव (प्रतिनिधी)-  चक्रवर्ती सम्राट अशोक विजयादशमी व धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा, फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समिती व सर्व समाज बांधव यांच्या वतीने बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. तसेच फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस देखील त्रिशरण पंचशील घेण्यात आले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भीम बुद्ध अनुयायांनी एकत्रीत येऊन अभिवादन केले.

कलिंग युध्द विजयी झाल्यानंतर चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी बौध्द धम्माचा स्वीकार केला. तर बोधिसत्त्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.14 ऑक्टोबर 1956 रोजी बौध्द धम्माचा स्वीकार केला. या ऐतिहासिक अशा घटनेला स्मरुन देश व जगभरात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले जाते. तर तथागत गौतम बुद्ध,सम्राट अशोक यांच्या कार्याला उजाळा दिला जातो. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी,समता सैनिक दल,इतर सामाजिक संस्था व नागरिक उपस्थित होते. तर समितीचे अध्यक्ष गणेश  वाघमारे, सचिव प्रवीण जगताप, संजय गजधने, पोलीस निरीक्षक देविदास हावळे, बाबासाहेब बनसोडे, संपतराव शिंदे, बाबासाहेब गुळीग, डॉ.रमेश कांबळे, बापु कुचेकर, स्वराज जानराव सह महिला भगिनी,बांधव उपस्थित होते.

 
Top