वाशी (प्रतिनिधी)- शिवाजी ज्ञानविहार शिक्षण मंडळाच्या अंकुरम विद्यामंदिर, वाशी येथे नवरात्रोत्सवानिमित्त गरबा आणि दांडिया नृत्याचा रंगतदार सोहळा उत्साहात पार पडला. भक्तिमय वातावरण, पारंपरिक वेशभूषा आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण शाळा परिसर उत्साहाने आणि आनंदाने भारून गेला.
नवरात्रोत्सवानिमित्त शाळेच्या आवारात देवी दुर्गेची आकर्षक मूर्ती साकारण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात देवीच्या आरतीने झाली. देवीच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने सोहळ्याची सुरुवात मंगलमय झाली.
यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून गरबा आणि दांडिया नृत्याचे सादरीकरण केले. रंगीबेरंगी पोशाख, तालबद्ध संगीत आणि नृत्याच्या ठेक्यांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या सहभागाने उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जाणीव, एकात्मता, परस्पर सहकार्य आणि सामूहिक सहभागाची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला शिवाजी ज्ञानविहार शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष केशर पवार, संचालक ओंकार पवार, वर्षा आवटे आणि सविता पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक डॉ. एम. शिवनाथन, सांस्कृतिक समन्वयक गंगा पवार आणि सर्व शिक्षकांनी केले. ‘रुजवतो ज्ञान, घडवतो कौशल्य' या ब्रीदवाक्याला साजेशा या सोहळ्यातून अंकुरम विद्यामंदिरने शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक विकासालाही महत्त्व दिल्याचे अधोरेखित झाले. देवी दुर्गेच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो, अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.
