कळंब (प्रतिनिधी)- दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याबरोबरच योग्य चारा व्यवस्थापनाबाबत पशुपालकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने माळकरंजा येथे मंगळवारी (दि. 6 ऑक्टोबर) चारा लागवड, निकृष्ट चाऱ्याचे पौष्टिक चाऱ्यामध्ये रूपांतर तसेच पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बायफ संस्थेचे अध्यक्ष डॉ. मणिभाई देसाई यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवातकरण्यात आली.

कार्यक्रमास धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, कळंबचे तहसीलदार हेमंत ढोकले तसेच पशुसंवर्धन विभागाचे डॉ. दीपक मुळे, डॉ. हनुमंत गायके, डॉ. बायस, डॉ. वैभव पाटील, डॉ. पांडुरंग इंगळे, डॉ. राऊत आणि बायफ संस्थेचे अतुल मुळे,  नूतन क्षीरसागर व संताजी मिसाळ उपस्थित होते. कळंब तालुक्यातील विविध विभागाचे व उमेदचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

उमेद अभियानाच्या माध्यमातून निवड झालेल्या महिलांना हिरवा चारा लागवडीसाठी BHN-11 हायब्रीड नेपियर चाऱ्याचे 30 हजार ठोंबांचे वाटप करण्यात आले. कळंब तालुक्यातील दहा गावांमधील 60 महिलांना या उपक्रमाचा लाभ देण्यात आला. तसेच उपस्थित सुमारे 125 महिला व पशुपालकांना खनिज मिश्रणाचे वाटप करण्यात आले. दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध असलेल्या निकृष्ट चाऱ्याचा प्रभावी वापर करून त्याचे पौष्टिक चाऱ्यामध्ये रूपांतर कसे करता येते, याचे डॉ. हनुमंत गायके यांनी सोयाबीन बुस्कट प्रक्रिया करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी काटेविरहित निवडुंग चारा पिकांची लागवड, अझोला कल्चर तसेच दुष्काळी परिस्थितीत चारा व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींबाबत पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी विविध प्रात्यक्षिकांची पाहणी केली. दुष्काळाच्या काळात पशुपालकांनी चारा व्यवस्थापनाचे आगाऊ नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. हिरव्या चाऱ्याच्या लागवडीसोबतच हायड्रोपोनिक पद्धतीने चारा उत्पादन करून पशुधनासाठी वर्षभर चाऱ्याची उपलब्धता राखण्याचे आवाहन त्यांनी पशुपालकांना केले.

पशुसंवर्धन विभागामार्फत सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, राष्ट्रीय पशुधन मिशनांतर्गत पशुधन विमा, कडबा कुट्टी यंत्रासाठी मागणी, चारा व्यवस्थापन तसेच इतर नाविन्यपूर्ण योजनांबाबत डॉ. दीपक मुळे व डॉ. पांडुरंग इंगळे यांनी उपस्थित पशुपालकांना मार्गदर्शन केले. पात्र पशुपालकांनी संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अर्ज साद करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बायफ व बी एस एस सोनाटा मायक्रो क्रेडिट यांच्या सामाजिक जबाबदारीतून पशुधन विकास कार्यक्रम अंतर्गत पशुपालकांसाठी सॉर्टेड सिमेन व पारंपरिक कृत्रिम रेतन, चारा लागवड, खनिज मिश्रण तसेच पशुधन व्यवस्थापनाशी संबंधित विविध उपक्रम हे मोफत राबविण्यात येत असल्याची माहिती श्री. अतुल मुळे यांनी दिली.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top