धाराशिव (प्रतिनिधी)- पुण्यात डॉल्बीच्या वापराला विरोध करत विवेकी आणि पर्यावरणपूरक भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांच्यावर मारहाण झाल्याची बातमी समाजमाध्यमांतून समोर आली आहे. या घटनेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तीव्र शब्दांत निषेध करते.

आपल्या देशाचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट वारंवार दिसून येते धर्मातील अनिष्ट प्रथा, परंपरा आणि रूढींना प्रश्न विचारणाऱ्या, शंका उपस्थित करणाऱ्या आणि त्याविरोधात विवेकाची भूमिका घेणाऱ्या व्यक्तींना वैचारिक प्रतिवाद करण्याऐवजी हिंसेने गप्प करण्याचे प्रयत्न झाले आहेत.

गौतम बुद्धांच्या विचारांना विरोध करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध कट रचले गेले. महात्मा ज्योतिराव फुले यांना ठार मारण्यासाठी मारेकरी पाठवले गेले. महात्मा गांधींची हत्या झाली. आणि आधुनिक काळात हा हिंसक प्रवाह डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. एम. एम. कलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांपर्यंत येऊन पोहोचला. विचारांचा प्रतिवाद विचारांनी करता येत नसेल, तर हिंसेचा आधार घेणे ही विवेकविरोधी मानसिकतेची लक्षणे आहेत. विद्यानंद बापट ज्या स्पष्टपणे, मुद्देसूदपणे आणि संदर्भांसह आपली भूमिका मांडत होते, त्या भूमिकेला वैचारिक उत्तर देण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करणे हा लोकशाही मूल्यांचा आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अपमान आहे.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या घटनेचा तीव्र निषेध करते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे आमची स्पष्ट मागणी आहे की, या हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची त्वरित ओळख पटवून त्यांना अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. विवेकी भूमिका मांडणाऱ्या नागरिकांना संरक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सातत्याने पर्यावरणपूरक आणि विवेकवादी भूमिका घेतली आहे. ध्वनिप्रदूषण, पर्यावरणाचे नुकसान आणि सार्वजनिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत न्यायालयांनी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळोवेळी मार्गदर्शक भूमिका आणि निर्देश दिलेले आहेत. विद्यानंद बापट यांची भूमिका याच व्यापक पर्यावरणपूरक आणि विवेकवादी भूमिकेशी सुसंगत आहे.

म्हणून शासनाने स्वतःच्या कायदेशीर आणि पर्यावरणपूरक भूमिकेचा पुरस्कार करणाऱ्या नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे आणि धर्माच्या नावाखाली कायदा हातात घेणाऱ्यांना स्पष्ट संदेश द्यावा की, हिंसेला कोणत्याही परिस्थितीत माफी नाही.

 
Top