वाशी (प्रतिनिधी)- “विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती असून त्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. तरुणांनी आपल्या ऊर्जेचा योग्य वापर करावा, वाईट गोष्टींना ठामपणे ‘नाही' म्हणावे आणि चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात राहावे,” असे प्रतिपादन वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकरराव शिंदे यांनी केले.
कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी येथे राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि वाशी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सोशल मीडियाचा सुरक्षितपणे व जबाबदारीने वापर तसेच महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत प्रतिबंधात्मक कायदेविषयक माहिती' या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून पोलीस निरीक्षक शंकरराव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर कोठावळे म्हणाले की, “मोबाईलचे तुम्ही मालक बना; परंतु त्याचे गुलाम बनू नका असे सांगितले.
यावेळी मराठी विषयातून नेट (राष्ट्रीय पात्रता चाचणी) परीक्षेत यश मिळवल्याबद्दल प्रा. प्रेरणा पाटील यांचा प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक शंकरराव शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अजितकुमार तिकटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. पार्थराज क्षीरसागर यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. नेताजी देसाई यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
