धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर 27 ऑगस्ट 2026 रोजी देशभरात ‘खेलो इंडिया संवाद खेल की बात, प्रधानमंत्री मोदी के साथ' या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत देशातील 1,500 हून अधिक शैक्षणिक संस्थांमधील युवा, खेळाडू आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील युवा व खेळाडूंशी संवाद साधला. भारताच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीत युवकांचा सहभाग वाढविणे, त्यांच्या आकांक्षा व अनुभव जाणून घेणे आणि विकसित भारताच्या निर्मितीत युवा शक्तीची भूमिका अधिक प्रभावी करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमादरम्यान क्रीडा विकास, ऑलिम्पिकसाठी प्रतिभाविकास, युवा नेतृत्व, विकसित भारत, फिटनेस व राष्ट्रनिर्माण या विषयांवर विशेष चर्चा करण्यात आली. युवा खेळाडूंना आपले अनुभव, कल्पना व सूचना मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. तसेच स्थानिक पातळीवर युवा संवादाच्या माध्यमातून क्रीडा सुविधा, प्रशिक्षण, प्रतिभा ओळख आणि युवकांच्या सहभागाबाबत विचारमंथन करण्यात आले.
स्थानिक सत्राचे अध्यक्षस्थान विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. रमेश चौगुले यांनी भुषविले. नगरसेवक इंद्रजित देवकते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय खेळाडू अश्विनी शिंदे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात क्रिडा संस्कृती, सुविधा, प्रशिक्षण, राष्ट्रीय व ऑलिंपिक खेळातील सहभाग आदि विषयावर विचारमंथन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी ठकार यांनी केले. तर प्रा. डॉ. गोविंद कोकणे यांनी आभार मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक जागरूकता, नेतृत्वगुण, संघभावना आणि राष्ट्रनिर्माणाची भावना वृद्धिंगत होण्यास मदत झाली. युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत “खेळातून व्यक्तिमत्त्व विकास आणि युवकांच्या सामर्थ्यातून विकसित भारत” हा संदेशन अधोरेखित केला.
