धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी मोठ्या संधी असून जिल्हा उद्योग,गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी सज्ज आहे. स्थानिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून उद्योग उभारावेत. स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि धाराशिवला राज्याच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करावे, असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. 

धाराशिव येथे आयोजित ‌‘जिल्हा गुंतवणूक परिषद धाराशिव 2026'चे पालकमंत्री सरनाईक यांनी ऑनलाइन उद्घाटन केले. परिषदेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, धनश्री जाधव समन्वय अधिकारी (मैत्री कक्ष) मुंबई तथा उपनिबंधक भागीदारी संस्था विधी व न्याय विभाग, संजय भुरेवाल सहाय्यक आयुक्त छत्रपती संभाजीनगर विभाग, अमर पाटील अध्यक्ष धाराशिव सहकारी साखर कारखाना, बाळासाहेब गीते संचालक कळंब सुयोग अमृतराव डायरेक्टर मॅनेजमेंट कॉलेज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिव, शिवराम तोतेवाड व्यवस्थापक सीडबी, देवा सुरवसे, मनोज घायाळ, डिजिटल मार्केटिंग, राजाभाऊ कोंढारे अध्यक्ष लघुउद्योग भारती संघटना, धाराशिव यांची प्रमुख उपस्थिती होती.

धाराशिवच्या आर्थिक परिवर्तनाची नवी सुरुवात म्हणून या गुंतवणूक परिषदेकडे पाहिले पाहिजे असे सांगून सरनाईक म्हणाले की,  कृषी, कृषीपूरक उद्योग, अन्नप्रक्रिया,अक्षय ऊर्जा,पर्यटन तसेच सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळू शकते.“या परिषदेत 37 उद्योगांसोबत तब्बल 7 हजार 534 कोटी 85 लाख रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार असून, त्यातून सुमारे 7 हजार 500 रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. ही केवळ आकडेवारी नसून धाराशिवच्या हजारो कुटुंबांच्या आशा आणि तरुणांच्या रोजगाराच्या संधी आहेत, असे  सरनाईक यांनी सांगितले. 

 जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की,मागील वर्षाच्या गुंतवणूक परिषदेच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली असून रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे. यावेळी संजय भुरेवाल, अमर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.


 
Top