परंडा (प्रतिनिधी)- 21 जून 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन "योग निरोगी वृद्धत्वासाठी (Yoga for Healthy Ageing)" व "एक पृथ्वी - एक आरोग्य यासाठी योग" या संकल्पनेनुसार उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर व वैद्यकीय अधीक्षक डॉ.जुबेर मोमीन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन सहअधीक्षक चंद्रकांत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्ण व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. आनंद गोरख मोरे (एम.डी.) यांनी सूर्यनमस्कार, योगासने व प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून "जीवन जगण्याचे विज्ञान आणि कला" (Yoga is a Science of Life and Art of Living) असल्याचे सांगितले.
सर्वप्रथम सर्वांना विश्वगुरू, विश्ववंद्य आणि भारतीय संस्कृतीची अस्मिता जपणाऱ्या, संपूर्ण जगासाठी वरदान ठरलेल्या २१ जून ‘आंतरराष्ट्रीय योग दिन
दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक विशेष संकल्पना (Theme) निश्चित केली जाते.मागील वर्षीची संकल्पना "योग : वसुधैव कुटुंबकमसाठी" अशी होती, तर यावर्षीची संकल्पना "योग : निरोगी वृद्धत्वासाठी (Yoga for Healthy Ageing)" अशी आहे. ही संकल्पना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर शारीरिक, मानसिक आणि आत्मिक आरोग्य जपण्याचा संदेश देते.
"स्व-परिवर्तनातून विश्वपरिवर्तनाकडे" हा संदेश देणारी योगी जीवनचर्या मनुष्याला सामान्यतेकडून दैवीत्वाकडे नेणारे एक संस्कारक्षम माध्यम आहे. ‘योग’ म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम आसने, प्राणायाम, सूर्यनमस्कार, ओंकार आणि विविध शारीरिक कवायतींचे चित्र उभे राहते. परंतु योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नव्हे; तर तो जीवन जगण्याचे शास्त्र आणि कला आहे.
योग ही सुसंस्कारी, सात्त्विक, दिव्य आणि संतुलित जीवन जगण्याची वैज्ञानिक पद्धती आहे. तो शरीर, मन आणि आत्मा यांचा समन्वय साधून व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवतो. म्हणूनच योगाविषयी असे म्हटले जाते — "Yoga is a Science of Life and an Art of Living."
योग शरीर आणि मनाचे रोग, दुःख व तणाव दूर करून आरोग्य, सुख आणि शांती प्रदान करतो. म्हणूनच भगवद्गीतेत योगाचे महत्त्व सांगताना एक सुंदर श्लोक आढळतो.
"युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा "
अर्थात,जो मनुष्य सात्त्विक व संतुलित आहार-विहार करतो, आपल्या कर्तव्यांचे योग्य पालन करतो तसेच योग्य प्रमाणात झोप आणि जागरण ठेवतो, त्याच्यासाठी योग सर्व दुःखांचा नाश करणारा ठरतो. त्यामुळे योगाचा खरा लाभ मिळवण्यासाठी नियमित योगाभ्यासाबरोबरच संतुलित जीवनशैली आवश्यक आहे.
योगशास्त्र निरोगी व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आत्मिक दृष्ट्या निरोगी ठेवते, तर रोगग्रस्त व्यक्तीचे रोग व दुःख हळूहळू कमी करण्यास सहाय्य करते. योग हा कोणत्याही एका संप्रदायापुरता मर्यादित नसून मानवजातीस सुख, शांती आणि आरोग्य प्रदान करणारा धर्मनिरपेक्ष जीवनमार्ग आहे.
आसन आणि प्राणायाम हे योगाचे महत्त्वाचे घटक असले तरी योगाचे खरे स्वरूप अष्टांग योगात सामावलेले आहे. महर्षी पतंजली यांनी सांगितलेल्या यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या आठ पायऱ्यांचा समन्वय म्हणजे अष्टांग योग होय. या योगमार्गाचे आचरण करणारा साधक परोपकारी, आदर्श आणि दिव्य गुणांनी युक्त व्यक्तिमत्त्व बनतो.
अष्टांग योगातील पहिली पायरी यम आहे. यात समाजात राहतानाचे नैतिक आचरण शिकवले जाते. अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य (संयमी जीवन) आणि अपरिग्रह (अनावश्यक संग्रह न करणे) या मूल्यांचा समावेश होतो. दुसरी पायरी नियम असून त्यात वैयक्तिक शुद्धता व आत्मविकासावर भर दिला जातो. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान या तत्त्वांचे पालन करण्यास प्रोत्साहन दिले जाते. आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथम समाजाशी कसे वागावे हे शिकवले जाते आणि त्यानंतर स्वतःच्या उन्नतीचा मार्ग दाखवला जातो — Service Before Self हा त्यामागील मूलभूत विचार आहे.
तिसरी पायरी आसन शरीराला सुदृढ, लवचिक आणि सक्षम बनवते. चौथी पायरी प्राणायाम मनाला प्रसन्न, एकाग्र आणि नियंत्रित ठेवते. श्वासाचे योग्य नियमन केल्याने मनावर नियंत्रण प्राप्त होते आणि मानसिक स्वास्थ्य वृद्धिंगत होते. पाचवी पायरी प्रत्याहार इंद्रियांना विषयवासनेच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यास मदत करते.
सहावी पायरी धारणा मनाला क्षणिक सुखांपासून दूर करून उदात्त आणि शाश्वत ध्येयाकडे वळवते. सातवी पायरी ध्यान मनातील चंचलता आणि अस्थिरता दूर करून मनाला एकाग्र, शांत आणि आनंदी बनवते. या अवस्थेत साधक आपल्या ध्येयाशी एकरूप होऊ लागतो आणि उच्च मूल्यांच्या दिशेने वाटचाल करतो.
अष्टांग योगाची अंतिम आणि सर्वोच्च पायरी म्हणजे समाधी. या अवस्थेत साधक पूर्ण एकाग्रता, तल्लीनता आणि आत्मबोधाच्या माध्यमातून परमसुखाचा अनुभव घेतो. आत्मतत्त्व आणि परमात्मतत्त्व यांचे ऐक्य अनुभवत तो शाश्वत आनंदाकडे वाटचाल करतो. अशा प्रकारे अष्टांग योग मनुष्याच्या शरीर, मन आणि आत्म्याचा समन्वय साधून त्याला वैयक्तिक उत्कर्षापासून विश्वकल्याणाच्या मार्गावर नेतो.
अष्टांग योगाच्या साधनेतून मनुष्य दैवी, परोपकारी आणि आत्मोन्नत अवस्थेकडे वाटचाल करतो. या अवस्थेत शरीर, मन आणि आत्मा यांचा सुंदर समन्वय साधला जातो. म्हणूनच संस्कृतमध्ये "युज्यते अनेन इति योगः" अशी योगाची व्याख्या केली आहे, म्हणजे जे जोडते, एकात्म करते ते योग होय. तसेच महर्षी पतंजली यांनी "योगश्चित्तवृत्तिनिरोधः" असे सांगितले आहे. याचा अर्थ चित्त म्हणजे मन आणि त्याच्या वृत्ती, भावना व विचार यांना नियमित व नियंत्रित करणे होय.
मन ही एक अमूल्य आणि शक्तिशाली ऊर्जा आहे. या शक्तीचे योग्य नियमन, नियंत्रण आणि एकत्रीकरण केल्यास मनुष्य स्वतःसाठी, कुटुंबासाठी, प्राणीमात्रांसाठी आणि समाजहितासाठी अगणित व अविश्वसनीय कार्य करू शकतो. जसे वाफ नियंत्रित करून तिच्यापासून निर्माण झालेल्या ऊर्जेवर रेल्वेचे इंजिन धावते, तसेच एकाग्र व नियंत्रित मन मानवाला असामान्य कार्य करण्यास सक्षम बनवते. एखाद्या टेकडीवरून वाहणारे छोटे-छोटे झरे, ओढे आणि नाले एकत्र येऊन जीवनदायी नदी निर्माण करतात व संपूर्ण सृष्टीचे पोषण करतात. त्याचप्रमाणे मनाची मशागत करून मनोनिग्रह प्राप्त केल्यास संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होते.
योगाच्या नियमित आचरणामुळे आपले दैनंदिन व्यवहार अधिक आत्मविश्वासपूर्ण, स्फूर्तीदायक, चैतन्यमय आणि परोपकारी बनतात. आजच्या गतिमान, भौतिकवादी आणि अत्यंत धावपळीच्या युगात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, दमा, संधिवात, आम्लपित्त, त्वचारोग तसेच विविध मनोकायिक विकार यांसारख्या असंसर्गजन्य रोगांचे (NCDs) प्रमाण वाढत आहे. अशा रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगाचरण ही काळाची अत्यावश्यक गरज बनली आहे.
म्हणूनच आपण सर्वांनी एकत्र संकल्प करूया – "वेळ द्या योगाला, नाहीतर निमंत्रण मिळेल रोगाला." योगशास्त्र ही भारतभूमीची जगाला मिळालेली अमूल्य देणगी असून संपूर्ण मानवजातीसाठी ते एक वरदान आहे. भारताला अध्यात्मभूमी, ऋषी-मुनींची भूमी आणि देवभूमी असे संबोधले जाते, त्यामागे येथील परोपकारी, त्यागमय, नैतिक, दैवी आणि योगप्रधान जीवनदृष्टीच कारणीभूत आहे.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटले आहे, "विश्व हेच एक राष्ट्र आहे आणि विश्वबंधुत्व हाच खरा धर्म आहे." तसेच "जय जगत" ही सर्वोदयी घोषणा मानवता, ज्ञानी माणुसकी आणि वैश्विक एकात्मतेचे दर्शन घडवणारी आहे. शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत आपल्या ऐतिहासिक भाषणातून यांनी संपूर्ण मानवजातीला संप्रदायनिरपेक्ष, सर्वसमावेशक आणि मानवकल्याणकारी दृष्टिकोनाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
भारतीय संस्कृतीने प्राचीन काळापासून संपूर्ण जगाला ज्ञान, अध्यात्म आणि मानवकल्याणाची दिशा दिली आहे. शाश्वत, त्रिकालाबाधित सत्याच्या आधारावर ऋषी, मुनी आणि संतांनी मानवाच्या आत्मोन्नतीसाठी, लोककल्याणासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी विविध ग्रंथरचना केल्या. या दिव्य ज्ञानपरंपरेतून उदयास आलेली, आत्मशोधातून आत्मबोध आणि आत्मकल्याणातून विश्वकल्याण साधणारी जीवनपद्धती म्हणजे अष्टांग योग होय.
अष्टांग योग हा कोणत्याही एका पंथ, जात किंवा संप्रदायापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण मानवजातीसाठी कल्याणकारी, विश्वशांतीची स्थापना करणारा आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांवर आधारित नैसर्गिक जीवनमार्ग आहे. या संस्कारातून मनुष्य दैवी गुणांनी संपन्न होऊन आत्मभावावर आरूढ होतो. त्याच्या मनात "हे विश्व माझ्यासाठी नसून मी या विश्वाचा जबाबदार घटक आहे" ही भावना दृढ होते. त्यातून विश्वबंधुत्व, परस्पर सहजीवन आणि सर्व प्राणीमात्रांप्रती करुणा विकसित होते.
अष्टांग योगाच्या संस्कारांनी समृद्ध झालेल्या भावी मानवसमाजात राष्ट्रांची अस्मिता टिकून राहील; राष्ट्रध्वज फडकतील, राष्ट्रगीते गायली जातील; परंतु त्याचबरोबर संपूर्ण मानवजातीच्या एकात्मतेचे प्रतीक म्हणून "जय जगत" ही घोषणा आणि विश्वबंधुत्वाची भावना अधिक दृढ होईल. मानवाला समत्व, शाश्वतता, अद्वैतभाव, आत्मज्ञान आणि दिव्य दृष्टी प्रदान करणारा अष्टांग योग हा विश्वशांतीचा प्रभावी मार्ग ठरू शकतो.
आज मानवजातीसमोर उभ्या असलेल्या पर्यावरणीय संकटे, युद्धजन्य परिस्थिती, हिंसा, असहिष्णुता आणि नैतिक अधःपतन यांवर मात करण्यासाठी अष्टांग योगाचे मूल्याधिष्ठित संस्कार आवश्यक आहेत. कारण व्यष्टी आणि समष्टी यांचा परस्पर संबंध अत्यंत निकटचा आहे. सृष्टी ही मानवी विचारांचे आणि आचरणाचे प्रतिबिंब असते. म्हणूनच जगातील प्रत्येक मानवाने आपल्या स्वधर्माचे पालन करत योगाचे संस्कार बालपणापासून, विशेषतः शालेय शिक्षणातून आत्मसात करणे आवश्यक आहे.
चला, आता "स्व-परिवर्तनातून विश्वपरिवर्तनाकडे" वाटचाल करूया. "कुर्वन्तु विश्वम् स्वास्थ्याम्" या महान ध्येयाने प्रेरित होऊन विश्वगुरू आणि विश्ववंद्य भारतीय संस्कृतीचा मूलाधार असलेल्या अष्टांग योगाचा स्वीकार करूया. ज्या ज्ञानाच्या प्राप्तीने इतर सर्व ज्ञानाचा प्रकाश प्राप्त होतो, त्या आत्मविद्येचा शोध घेऊया. सर्व धर्मांच्या सारभूत शिकवणीचा गाभा म्हणजे मानवकल्याण, आत्मोन्नती आणि विश्वबंधुत्व; आणि त्याचे सशक्त माध्यम म्हणजे दैवी अष्टांग योग होय.
डॉ. आनंद गोरख मोरे
एम.डी. (आयुर्वेद), योग शिक्षक
आयुष वैद्यकीय अधिकारी,
