धाराशिव (प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे अल्पवयीन चिमुकलीवर झालेला अत्याचार व तिची निर्घृण हत्या ही अत्यंत संतापजनक व मानवतेला काळिमा फासणारी घटना असून, या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, धाराशिव जिल्हा संघटना यांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.

समाजातील महिलांवर व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात कठोर भूमिका घेत, संघटनेने या प्रकरणात दोषींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी शासनाने तातडीने प्रभावी पावले उचलावीत, अशी भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जिल्हाधिकारी, धाराशिव यांना निवेदन देण्यात आले.

संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे

आरोपीस कठोरातील कठोर शिक्षा (फाशीची शिक्षा) देण्यात यावी. पीडित कुटुंबास तातडीने आर्थिक मदत व न्याय मिळवून द्यावा. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायदेशीर उपाययोजना अधिक सक्षम कराव्यात व सुरक्षा व्यवस्था बळकट करावी. तसेच महिलांवर व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी शासनाने अधिक प्रभावी धोरणे राबवावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हे निवेदन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, धाराशिव यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष ॲड. गजानन चौगुले, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अजित गुंड पाटील, महामंत्री विजयकुमार वाघमारे, जिल्हा संयोजक राजकुमार गाढवे, अनिकेत नवले, यांनी सादर केले.

 
Top