धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पातील अत्यंत कठीण आणि महत्त्वाचा टप्पा असलेल्या शिंगोली जवळील सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे पुलाचे काम आता प्रगतीपथावर आहे. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वाधिक लांबीचा 106 मीटर लांबीचा सिंगल स्पॅन पूल ठरणार असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या 84.44 किमी लांबीच्या नवीन रेल्वे लाईनचे कामाच्या प्रगतीचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शिंगोळी याठिकाणी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला. सध्या हे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाचा धाराशिव ते तुळजापूर हा पहिला टप्पा मार्च 2027 पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे. तर, सोलापूर ते तुळजापूर हा दुसरा टप्पा त्यानंतर पूर्ण केला जाणार आहे. यामुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पांतर्गत शिंगोली येथे सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गाला क्रॉस करणारा भव्य पूल बांधण्यात येत आहे. तांत्रिकदृष्ट्या हा पूल अतिशय भव्य असून, दोन खांबांमधील अंतर तब्बल 106 मीटर इतके असणार आहे. एवढ्या मोठ्या अंतराचा सिंगल स्पॅन असलेला हा मध्य रेल्वेचा पहिलाच पूल असल्याचे सांगितले जात आहे. पुढील 8-9 महिन्यांत हे काम पूर्ण होणार असून सध्या या ठिकाणी ड्रिलिंग आणि पायाभरणीचे काम वेगात सुरू आहे. पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी साधारणपणे 3 महिन्यांचा कालावधी अपेक्षित असून, त्यानंतर लॉन्चिंग आणि इतर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 8 ते 9 महिने लागणार आहेत. यासाठी आधुनिक मशिनरी आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. कामादरम्यान महामार्गावरील वाहतुकीचे नियोजन करून पुलाच्या उभारणीचे टप्पे पूर्ण केले जाणार आहेत. या प्रकल्पाच्या प्रगतीमुळे धाराशिवकरांच्या रेल्वे स्वप्नाला आता नवी गती मिळाली असून, स्थानिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
धाराशिव रेल्वे स्थानकाचेही काम प्रगतीपथावर
धाराशिव रेल्वे स्थानकापासून या रेल्वे ट्रॅकचे काम शिंगोलीच्या दिशेने वेगाने सरकत आहे. हा नवीन मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर तुळजापूर हे तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडले जाणार आहे, ज्याचा फायदा लाखो भाविकांना आणि स्थानिक नागरिकांनाही होणार आहे. हा 106 मीटरचा पूल या मार्गावरील अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना असेल. सध्या ड्रिलिंग सुरू असून पुढील काही महिन्यांत पुलाचा मुख्य सांगाडा उभा राहिलेला सर्वांना पाहायला मिळणार आहे.
