परंडा (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयात शुकवार दि.1 मे रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर तसेच महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम’ या गीताने झाली.त्यानंतर ध्वजारोहण करून राष्ट्रगीत सादर करण्यात आले व शेवटी महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव या संस्थेचे संस्थापक कै.रा.गे.शिंदे गुरुजी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांमुळे महाराष्ट्राला प्रगत आणि विकसित राज्य म्हणून ओळख मिळाली आहे.संत परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि महापुरुषांचे विचार ही महाराष्ट्राची खरी ताकद असून देशासमोरील आव्हाने दूर करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने योगदान देणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.कृष्णा परभणे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य डॉ.महेश कुमार माने, कनिष्ठ विभाग पर्यवेक्षक डॉ.किरण देशमुख, कार्यालय अधिक्षक श्रीमती पद्मा शिंदे यांच्यासह कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले तर डॉ.कृष्णा परभणे यांनी आभार मानले.
