धाराशिव (प्रतिनिधी)-  शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवा वेळेत,पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे मिळाल्या पाहिजेत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ची काटेकोर अंमलबजावणी करून नागरिकांचा वेळ आणि पैशांची बचत होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 28 एप्रिल रोजी सेवा हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप सिंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे, उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड तसेच उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की, सेवा हमी कायद्याचा दरमहा आढावा घेतला जात असून नागरिकांना वेळेत सेवा मिळणे ही प्रशासनाची प्राथमिकता आहे.  मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत विविध सेवा नागरिकांपर्यंत वेगाने आणि पारदर्शकपणे पोहोचल्या पाहिजेत. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे यांनी उपस्थितांना सेवा हक्क दिनाची शपथ दिली.महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल धाराशिवचे उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी जिल्ह्यातील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत कामगिरीचे सादरीकरणही करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी - कर्मचारी तसेच आपले सेवा केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन आणि आभार तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी मानले.


 
Top