धाराशिव (प्रतिनिधी)- उन्हाळी हंगाम 2025-2026 साठी राज्य शासनाच्या कृषी,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या निर्णयानुसार संपूर्ण राज्यात 8 एप्रिल 2026 पासून ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची अचूक नोंद वेळेत करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
उन्हाळी हंगामासाठी शेतकरी स्तरावरील पीक नोंदणीचा कालावधी 8 एप्रिल 2026 ते 24 मे 2026 असा निश्चित करण्यात आला आहे, तर सहायक स्तरावरील कालावधी 25 मे 2026 ते 8 जुलै 2026 राहणार आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी 24 मे 2026 पर्यंत ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक नोंदणी पूर्ण करणे आवश्यक असून जिल्ह्यात 100 टक्के पीक नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या या डिजिटल उपक्रमामुळे कृषी व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार असून शासनाच्या योजनांचा लाभ अधिक पारदर्शक आणि वेगवान पद्धतीने मिळण्यास मदत होणार आहे.त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून पीक नोंदणी वेळेत पूर्ण करावी,असे प्रशासनाने आवाहन केले आहे.