धाराशिव (प्रतिनिधी)-  शिक्षण व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत शैक्षणिक गुणवत्तावाढ व प्रशासनिक बाबीं संदर्भात विविध विषयांवर चर्चा करून महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आले.

इयत्ता 1 ली ते 5 वी साठी सेमी-इंग्रजी अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक वर्ष जून 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे. धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एकसमान रंगाचा गणवेश असणार असून, त्या गणवेशाचा रंग पुढील बैठकीत निश्चित करण्यात येईल. गणवेश खरेदीचा अधिकार शाळा व्यवस्थापन समिती यांना देण्यात आला आहे. शाळा एकत्रीकरण प्रक्रियेत मुलांची व मुलींची वेगवेगळी शाळा एकाच आवारात असल्यास त्यांचे एकत्रीकरण करण्यात येईल. तसेच एकाच आवारातील इतर शाळांबाबतचा अंतिम निर्णय संबंधित शाळा व्यवस्थापन समिती घेणार आहे. सेमी इंग्रजी अंमलबजावणीसंदर्भात सर्व शाळांनी दोन दिवसांच्या आत ठराव सादर करावेत. या ठरावांना दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मान्यता दिली जाणार आहे.

सेमी-इंग्रजी अभ्यासक्रमासाठी सर्व शिक्षकांचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 100 टक्के विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांत सहकार्यवाह किशोर पिसे यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे बाजू मांडली. या बैठकीस जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषाताई गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर, शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच विविध शिक्षक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top