धाराशिव (प्रतिनिधी)- समाजातील बालकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षण,आरोग्य व सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी बालविवाहास आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी नागरिकांना थेट आणि ठाम आवाहन करत,19 एप्रिल 2026 रोजीच्या अक्षय तृतीया मुहूर्तावर कोणत्याही ठिकाणी बालविवाह आढळल्यास तात्काळ गुन्हा नोंदवावा,असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 संपूर्ण राज्यात लागू असून, त्यासोबत महाराष्ट्र बाल विवाह प्रतिबंध नियम 2022 देखील अंमलात आहेत.
केंद्र शासनाच्या ‘बाल विवाह मुक्त भारत’ अभियानांतर्गत बालविवाह रोखण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.या कायद्यानुसार ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका आणि शहरी भागात पर्यवेक्षिका यांची सहाय्यक बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या कायद्याअंतर्गत बालविवाह करणे किंवा आयोजित करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे.
अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त मानला जात असल्यामुळे या दिवशी राज्यात मोठ्या प्रमाणावर सामूहिक तसेच वैयक्तिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. मात्र,याच दिवशी बालविवाह होण्याची शक्यता जास्त असल्याचे लक्षात घेता,जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दि.19 एप्रिल रोजी संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी पोलीस विभाग,बाल संरक्षण समिती तसेच इतर यंत्रणांच्या समन्वयाने प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात बालविवाह होऊ नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना राबविणे,व्यापक जनजागृती करणे आणि ‘1098’ चाइल्ड हेल्पलाईन या टोल फ्री क्रमांकाचा प्रचार-प्रसार करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
ग्रामपंचायत अधिकारी तथा बालविवाह प्रतिबंध अधिकारी, अंगणवाडी सेविका तथा सहाय्यक बालविवाह प्रतिबंध अधिकारी तसेच कोणत्याही सजग नागरिकांनी बालविवाहाची घटना आढळल्यास तात्काळ हस्तक्षेप करून ती थांबवावी आणि त्याबाबतचा अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,धाराशिव यांच्याकडे सादर करावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा टास्क फोर्स (बालविवाह प्रतिबंध) अध्यक्ष कीर्ती किरण पूजार यांनी स्पष्ट केले आहे की,अक्षय तृतीया या मुहूर्तावर बालविवाह झाल्याचे आढळल्यास बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 व नियम 2022 अंतर्गत पालक,आचारी,मंडप मालक, पुजारी/काझी,वाजंत्री,हॉल चालक, स्वयंपाकी,उपस्थित नातेवाईक, विवाह आयोजक आणि संबंधित सर्व नागरिकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल. बालविवाहाची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ चाइल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल,अशी हमी प्रशासनाने दिली आहे.
समाजाच्या भविष्यासाठी प्रत्येक बालकाचे बालपण सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे बालविवाहास ठाम नकार देत,कायद्याच्या अंमलबजावणीत सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे भावनिक आणि कडक आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी केले आहे.