धाराशिव (प्रतिनिधी)- सोशल मीडियाचा आपण सर्वांनी मर्यादित वापर केला पाहिजे, आवश्यकता पडल्यास मोबाईलचा उपवास देखील करावा असे आवाहन प्रसिद्ध चित्रकार शिवाजी हांडे यांनी केले. 

संस्कार भारती देवगिरी प्रांताने निर्माण केलेल्या 2026 - 2027 दैनंदिनीचे प्रकाशन प्रसिद्ध चित्रकार शिवाजी हांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी देवगिरी प्रांताच्या अध्यक्षा प्रा. स्नेहलताई पाठक या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रांत महामंत्री डॉ. जगदीश देशमुख, उपाध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख, संगीत तज्ञ पंडित संजय जोशी, लातूर जिल्हाध्यक्ष जितेंद्र देशमुख, महानगर अध्यक्ष शरद पाडे, प्रांत उपाध्यक्ष डॉ.देवेंद्र कुलकर्णी, सह महामंत्री  डॉ.सतीश महामुनी, दृश्य कला संयोजक शेषनाथ वाघ, प्रांतमंत्री धनंजय देशपांडे, धाराशिव जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर बन्साळी, उपाध्यक्ष प्रफुल्ल कुमार शेटे, जिल्हा सचिव प्रवीण गोरे, शहर सचिव गणेश कसपटे यांची उपस्थिती होती. या निमित्ताने जिल्हाध्यक्ष जितेंद्र देशमुख, महानगराध्यक्ष शरद पाढे, डॉ मंदाकिनी कुलकर्णी, डॉ. जयंती आंबेगावकर यांच्या शुभहस्ते मान्यवरांचे स्वागत झाले. दैनंदिनीचा वापर, अत्याधुनिकता, मोबाईलचा वापर, मोबाईल उपवास या विषयावर प्रांताचे महामंत्री डॉ. जगदीश देशमुख यांनी प्रास्ताविकात केले. 

याप्रसंगी देवगिरी प्रांत दैनंदिनीचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समन्वयक संतोष बिडकर व धन्वंतर देशपांडे यांच्या सात संघतीसह ध्येय गीताचे गायन , दीप प्रज्वलन झाले.  या निमित्ताने बोलताना प्रमुख अतिथी कलाध्यापक चित्रकार शिवाजी हांडे यांनी कलावंत बोलतो कमी आणि आपल्या कलाविष्कारातून जास्त व्यक्त होतो असे सांगून आजच्या धावपळीच्या जगामध्ये प्रगती होण्यासाठी मोबाईलचा कमीत कमी व आवश्यक वापर करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा, जनजागृती करावी, विद्यार्थी संवाद व पालक संवाद घडवून आणावा असे आवाहन केले. 

अध्यक्षीय समारोप करताना प्रांत अध्यक्ष प्रा स्नेहलताई  पाठक यांनी संस्कार भारती ललित कलांच्या माध्यमातून कलावंताची संघटन करीत असताना कलेच्या प्रांतात राष्ट्रीय विचार देण्याचे काम करते. कलेच्या माध्यमातून जनजागृती समाज प्रबोधन घडवून आणते. कलावंतांना जोडते तसे माणसाला माणूस जोडण्याचे काम करते, कलावंत आपल्या कलाकृती मधून सर्व काही सांगून जातो योग्य संदेश व विचार देतो असे सांगितले. डॉ.हरिभाऊ वाकणकर व पद्मश्री योगेंद्रजी यांच्या कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन तळीखेडे व आभार प्रदर्शन रघुनाथ पाटील यांनी केले. सौ.शुभांगी कुलकर्णी यांनी पसायदान गायन केले. सौ रुपाली नाईक, सौ.रूपा देसाई यांनी भूअलंकरण केले. सौ नीलिमा कुलकर्णी, धनंजय पटवारी, सो मंजुषा देशमुख, हनुमंत पांचाळ यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

 
Top