धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचावा,यासाठी राज्यभर व्यापक स्तरावर “अमृत परिवार सर्वेक्षण अभियान” हाती घेण्यात आले आहे.
या अभियानाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात 8 एप्रिल ते 25 या कालावधीत सर्वेक्षण राबविण्यात येणार आहे.खुल्या प्रवर्गातील ज्या समाजघटकांना इतर कोणत्याही संस्था किंवा महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, तसेच वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना या उपक्रमातून विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटात ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती,पटेल,राजपूत, राजपुरोहित,हिंदू नेपाळी,बनिया, कम्मा,कायस्थ,अय्यंगार,नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगुनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य आदी समाजघटकांचा समावेश आहे.या घटकांतील विद्यार्थी, तरुण, महिला, व्यावसायिक व शेतकरी यांच्यासाठी संस्थेमार्फत विविध विकासाभिमुख योजना उपलब्ध आहेत.
सर्वेक्षणाच्या कालावधीत अमृत संस्थेचे प्रतिनिधी लक्ष्यित कुटुंबांशी थेट संपर्क साधून माहिती संकलित करणार आहेत. तसेच विविध सामाजिक संस्था,संघटना व मंडळांकडूनही आवश्यक माहिती घेण्यात येणार आहे. संबंधित घटकांतील व्यक्ती,संस्था व संघटनांनी या कालावधीत अमृत प्रतिनिधींशी संपर्क साधून आपल्या कुटुंबाची तसेच समाजाची माहिती नोंदवावी आणि उपलब्ध योजनांची सविस्तर माहिती घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे. अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबाची नोंदणी करून घ्यावी,असे आवाहन अमृत संस्थेमार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी : चिन्मय कुलकर्णी,जिल्हा व्यवस्थापक, अमृत,धाराशिव मो. 7391065469 यांचेशी संपर्क साधावा.