धाराशिव (प्रतिनिधी)-  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना आता यश आले आहे. केवळ शेतीवर अवलंबून असलेला आपला जिल्हा आता जागतिक स्तरावर संरक्षण उत्पादन केंद्र (ऊशषशपीश र्कील) म्हणून ओळखला जाईल. वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर ग्लोब फोर्ज लिमिटेड अर्थात पूर्वीची निबे लि. या नामांकित कंपनीने कौडगाव एमआयडीसीत पहिल्या टप्प्यात तब्बल अंदाजे 2000 कोटी रुपयांची भव्य गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. या प्रकल्पामुळे जिल्हयातील 3000 पेक्षा अधिक तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

हा प्रकल्प केवळ कारखानदारीपुरता मर्यादित नसून तो शेती आणि तंत्रज्ञान यांचा संगम आहे. या ठिकाणी दोन प्रमुख प्रकल्प आकारास येणार आहेत. पहिल्या टप्प्यात कौडगाव एमआयडीसीतील 1000 एकर जागेवर संरक्षण दलासाठी आवश्यक असलेले टीएनटी (TNT) आणि प्रपोलेंट तयार केले जातील. धाराशिवमध्ये मिसाईल्स आणि संरक्षण साहित्य तयार करण्यासाठी मोठा प्रकल्प साकारत असलेल्या ग्लोब फोर्ज कडून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीही आनंदाची बातमी आहे. याच ठिकाणी नेपियर ग्रासवर आधारित सीबीजी (कॉम्प्रेसड बायोगॅस) प्लांट उभारला जाणार आहे. याला लागणारे गवत जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून घेतले जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे तसेच नैसर्गिक खत देखील उपलब्ध होणार आहे.यात तयार होणारा सीबीजी आणि खत जिल्ह्यातच देण्याबाबत कंपनी सोबत ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कंपनीचे प्रमुख गणेश निबे यांच्याशी 8 एप्रिल 2025 रोजी पहिली भेट झाली होती. त्यांनी 1 हजार एकर जागेची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांना आपण आपल्या जिल्ह्यातील कौडगाव, होर्टी, माळुंब्रा, अपसिंगा अशा विविध जागा दाखवल्या होत्या. अखेर त्यांनी कौडगाव एमआयडीसी येथील जागेवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याच्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नेताजी पाटील, नगराध्यक्षा नेहा काकडे, उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे, नगरसेवक राहुल काकडे आदी उपस्थित होते.



भविष्यात 5000 एकरवर डिफेन्स हब

कौडगाव एमआयडीसीला लागूनच भविष्यात साधारण 5000 एकरवर संरक्षण क्षेत्राशी निगडित एक महाकाय हब उभारण्याचे नियोजन आहे. ग्लोब फोर्ज (नेबे इंडस्ट्रीज) यांनी त्यासाठी शब्द दिला आहे.2004 साली आपण कौडगाव जवळ उपलब्ध असलेली 10 हजार एकर पडीक जमिनीवर औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचे ठरवले होते.त्यापैकी सुरुवातीला 1500 एकर संपादित केले आहे.आता डिफेन्स हब साठी पडीक जमीन उपलब्ध करून देण्यात येईल. 

आमदार राणाजगजितसिंह पाटील 


 
Top