धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त केंद्र व राज्य शासनाकडून विविध सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या योजना राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत केंद्र शासनाने सन 2015 मध्ये जाहीर केलेल्या ‘स्टँडअप इंडिया’ योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांसाठी विशेष आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील सवलतीस पात्र नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी आर्थिक पाठबळ दिले जाते. अर्जदाराने प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 10 टक्के स्वहिस्स्याचा भरणा केल्यानंतर आणि बँकेमार्फत स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर झाल्यानंतर उर्वरित 15 टक्के ‘फ्रंट एंड सबसिडी’ राज्य शासनामार्फत देण्यात येते.
या योजनेचा लाभ स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.इच्छुक लाभार्थ्यांनी आयुक्त,समाज कल्याण,महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्या नावे विहित नमुन्यातील मागणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे : उद्योग आधार नोंदणी पत्र,जात प्रमाणपत्र,बँकेचे कर्ज मंजुरी पत्र,बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्प अहवालाची प्रत,शासनाने नमूद केलेली इतर आवश्यक कागदपत्रे.या सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र नवउद्योजकांनी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, धाराशिव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना उद्योगक्षेत्रात सक्षम करण्यासाठी आणि स्वावलंबनाची नवी संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.