तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील अंणदुर गावचे सुपुत्र आणि तुळजाभवानी मंदिर ट्रस्टमध्ये येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेले पैलवान महादेव सुभाषराव घोडके यांनी कुस्ती क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करत तालुका आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
पैलवान महादेव सुभाषराव घोडके यांनी अवघ्या एका महिन्यात तब्बल 10 गदा जिंकत दमदार कामगिरी केली. अंणदुर, शहापूर, आरळी, खुदावाडी, शिंदफळ यांसह धाराशिव जिल्ह्यातील विविध ठिकाणी आणि कर्नाटक राज्यातील स्पर्धांमध्ये त्यांनी विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली.
रोख 11 हजारांचा सन्मान; खुराकाचीही घोषणा
या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा स्थानिक नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या हस्ते रोख 11,000 रुपयांचे बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच त्यांच्या पुढील तयारीसाठी दरमहा खुराक देण्याची घोषणाही करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी महादेव घोडके यांच्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे विशेष कौतुक केले. त्यांच्या यशामुळे तुळजापूर तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले असून, युवकांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत. या सन्मान सोहळ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय सर गंगणे, सामाजिक कार्यकर्ते पांढरे, संग्राम पाटील, गणेश भिंगारे, मनोज गवळी, गटनेते औदुंबर कदम, नगरसेविका प्रियंका गंगणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पैलवान महादेव घोडके यांच्या या यशाने तुळजापूर तालुक्याचा क्रीडा मान उंचावला असून, त्यांच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशीच दमदार कामगिरी कायम ठेवत राज्यस्तरावर नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरातून दिल्या जात आहेत.
