धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील महाकाली कला केंद्र येथे राडा घालुन तोडफोड केल्या प्रकरणी 12 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महाकाली कला केंद्र येथील एका नृत्य गटाची मालकीन हिने दिलेल्या तक्रारीनंतर येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादीत वादाचे कारण नमुद नसुन आरोप प्रत्यारोप होत आहेत. कोयत्यासारख्या घातक शस्त्रानी हल्ला करण्यात आला असुन यात 8 लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर कला केंद्राचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
11 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता काही जणांनी हल्ला केला. घराच्या खिडकीचा काचा फोडल्या व कोयत्याने घराचा दरवाजा तोडत कोयता उगारून शिवीगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण केली. कोयत्याने कार्डीओ मशीन (रनिंग मशीन), टीव्हीं, फ्रीज, एसी व कपाट तोडले. हातातील तलवार उगारून कपाटातील 2 लाख व 5 तोळ्याचे सोन्याचे लॉकेट, 12 ग्रॅमची कानातील सोन्याची साखळी घेऊन गेले. 70 प्लास्टीकच्या खुर्ची, 3 प्लास्टीकच्या पाण्याच्या टाक्या, 10 पाण्याचे, 3 एसी, गाडीच्या काचा असे 8 लाखांचे नुकसान केले.
येडशी गावातील एका तरुणाला कला केंद्र चालकांनी विनाकारण मारहाण केली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी गावातील तरुण गेले असता, कला केंद्र चालकांनीच त्यांना मारहाण केल्याचा आरोप दुसऱ्या गटाने केला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 333,119(1), 118(1),115(2), 352,351(2),351(3)324(5)191(2),191(3) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. येरमाळा येथील पीएसआय स्वप्नील भोजगुडे हे याचा तपास करीत आहेत.