तुळजापूर : धाराशिव तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाटोदा–करजखेडा परिसरात रविवारी दुपारी भीषण तिहेरी अपघात घडला. लातूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या बोलेरो वाहनाने प्रथम वॅगनार कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर नियंत्रण सुटलेल्या एम.एच -४५- ए. झेड.५४४९ या नंबच्या बोलेरोने कटडा तोडून तुळजापूरकडे येत असलेल्या होंडा सिटी कारला समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातात होंडा सिटी कारमधील एकजनाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोलेरो गाडी लातूरच्या दिशेने सुसाट वेगाने जात होती. यावेळी मद्यपान केलेल्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बोलेरोने पुढे असलेल्या वॅगनार कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर बोलेरो वाहन आणखी वेगाने पुढे जाऊन कटडा तोडून समोरून लातूरच्या दिशेने येणाऱ्या होंडा सिटी कारला समोरासमोर धडकली. या समोरासमोर झालेल्या धडकेत होंडा सिटी कारचे मोठे नुकसान झाले.
या अपघातात होंडा सिटी कारमधील जीवन वसंत पाटील (वय ७०) यांचा मृत्यू झाला. तर नित्यानंद मोहन बुके (वय ३५), मोहन बुके (वय ५५), अर्जुन पटुळे (वय ५५) व आणखी एक अनोळखी पुरुष (अंदाजे वय ४०) असे चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालय, धाराशिव येथे हलविण्यात आले आहे.अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की काही काळ घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच बेंबळी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे पाठविण्याची व्यवस्था केली.
दरम्यान, अपघातामुळे काही काळ तुळजापूर–लातूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.या अपघाताबाबत पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पाटोदा–करजखेडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
