कळंब (प्रतिनिधी)- गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नगर परिषद शाळांमध्ये “प्रवेश वाढवा अभियान” मोठ्या उत्साहात पार पडले. पीएमश्री नगर परिषद शाळा क्रमांक 02 येथे नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळांमध्ये प्रवेश वाढवण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे यांच्या हस्ते नव्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व गुढी पाडव्याचा पारंपरिक हार देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला. पालक व नागरिकांनीही या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला.

तसेच, नगर परिषदेमार्फत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आधुनिक शिक्षण देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. याअंतर्गत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटर तसेच आय.डी.एल. सेंटर यांचे उद्घाटन नगराध्यक्षा सुनंदा कापसे यांच्या हस्ते करण्यात आले. या आधुनिक सुविधांमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण मिळणार आहे.

या कार्यक्रमाला नगर परिषद उपाध्यक्ष लखन गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुनीरोद्दीन शेख, नगरसेवक सागर मुंडे, सौ. सफूरा काझी, सौ. अर्चना मोरे, प्रशांत लोमटे, हर्षद अंबुरे, भूषण करंजकर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “नगर परिषद शाळांमार्फत विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटर हे केवळ कळंब शहरासाठीच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल. भविष्यात नगर परिषद शाळा पूर्णपणे डिजिटल व अद्ययावत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

या उपक्रमामुळे नगरट परिषद शाळांबद्दलचा विश्वास अधिक दृढ होत असून, पालक व विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्ता व आधुनिकतेचा संगम घडवून आणण्याचा नगर परिषदेचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.


 
Top