सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार व समाजवादी विचारांचे नेते स्व. आमदार माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा “कार्यक्षम खासदार पुरस्कार” धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना प्रदान करण्यात आला. नाशिक येथील प. सा. नाट्यमंदिर, टिळक पथ येथे पार पडलेल्या या सोहळ्यात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते खासदार ओमराजे निंबाळकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापूर्वी या पुरस्काराने महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते व लोकप्रतिनिधींचा गौरव करण्यात आला आहे. त्यामध्ये बी. टी. देशमुख, गणपतराव देशमुख, आर. आर. आबा पाटील, प्रमोद नवलकर, शोभाताई फडणवीस, जीवा पांडू गावित, दत्ताजी नलावडे, गिरीश बापट, सा. रे. पाटील, भाऊसाहेब कुंडकर, जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, बच्चुभाऊ कडू, नीलमताई गोरे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, नितीन गडकरी, भारतीताई पवार यांसारख्या मान्यवरांचा समावेश आहे.
समाजवादी विचारांचे अध्वर्यू स्व. आमदार माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा हा पुरस्कार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संसदीय कार्यातील सक्रियता, जनतेच्या प्रश्नांबाबत सातत्याने मांडलेला आवाज आणि विकासासाठी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमाताई हिरे, महापौर हिमगौरी आडके, प्रा. दिलीपराव फडके, सुनील कुटे, संजय करंजकर, सुरेश गायधने, सचिन महाजन, शोभाताई नेरलिनार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, हा पुरस्कार स्वीकारताना मिळालेली ₹५०,००० ची रोख रक्कम खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्याच क्षणी सार्वजनिक वाचनालयाला परत अर्पण केली. ज्ञान, विचार आणि वाचनसंस्कृतीचा प्रसार व्हावा, समाजात बौद्धिक जागरूकता निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने वाचनालये कार्यरत असतात. त्या ज्ञानपरंपरेला आणि समाजप्रबोधनाच्या कार्याला आपल्या कडून छोटासा हातभार लागावा, या भावनेतून त्यांनी ही रक्कम वाचनालयाला अर्पण केली.
हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून धाराशिवच्या जनतेचा सन्मान असल्याची भावना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली. शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासामुळेच आपण संसदेत पोहोचलो असून त्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे मांडत विकासासाठी अधिक जोमाने कार्य करत राहू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
