धाराशिव (प्रतिनिधी)- कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर शहराला लाभलेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध करण्यासाठी, तसेच स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे लवकरच सर्व सोयींनी युक्त असे पूर्णतः वातानुकूलित भव्य आणि अद्यावत नाट्यगृह उभारणार असल्याची अशी ग्वाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे तुळजापूर आणि परिसरातील नाट्य चळवळीला मोठी उभारी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पंचरंग प्रतिष्ठान आयोजित श्री क्षेत्र तुळजापूर राज्यस्तरीय पंचरंग करंडक एकांकिका लेखन स्पर्धा 2025-26 चा पारितोषिक वितरण आणि निवडक एकांकिकांच्या “अंकुर“ या संग्रहाचा प्रकाशन सोहळा हॉटेल स्कायलँड येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला आमदार पाटील यांनी ऑनलाईन माध्यमातून उपस्थित राहून नवोदित लेखकांच्या सृजनशीलतेचा गौरव केला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख, ख्यातकीर्त सिने गीतकार तथा प्रसिद्ध कवी व नाट्य लेखक प्रा. डॉ. दासू वैद्य उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने सोहळ्याची उंची अधिकच वाढली. व्यासपीठावर तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे, उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, प्रसिद्ध अभिनेते उमेश जगताप, शंतनू गंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पंचरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत नाडापुडे, सचिव प्रा. संभाजीराव भोसले, उपाध्यक्ष सचिन घोडके, स्पर्धा संयोजक महेश धुमाळ आणि दिग्विजय भोसले यांच्यासह नाट्य व साहित्य क्षेत्रातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व विजेत्या लेखकांचे आणि अंकुर संग्रहात स्थान मिळवलेल्या साहित्याचे यावेळी मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात लौकिकस्पद कामगिरी बजावल्याबद्दल सरोजा नरेश अमृतराव, नीता दिनेश क्षीरसागर डॉ. शिवतेज संभाजी भोसले, डॉ. निविता नारायण नन्नवरे कु. सृष्टी धनंजय पाटील, प्रा. ऋतुजा अनिल रोचकरी, कासिफ ख्वाजा सय्यद, स्वप्नील ऋषीकांत भोसले, डॉ. रिया राजेश शिंदे, भक्ती सुधाकर उळेकर, शिवतेज सुधाकर उळेकर, तुषार तुळसीदास साखरे, आदिती सचिन घोडके, रुहान शंतनू गंगणे, श्रुती राजेश चोपदार, आयुष राजेश जगताप वरील सर्व मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

