धाराशिव (प्रतिनिधी)- महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत केंद्र सरकारने देशभरातील 14 वर्षांच्या मुलींना मोफत गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील लसीकरण कार्यक्रमास मंजुरी दिली आहे. हा निर्णय खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे फलित मानले जात आहे.
दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजीच्या लोकसभेच्या कामकाजात अनुक्रमांक 155 अंतर्गत विधेयक क्र. 192/2025 म्हणून खासदार निंबाळकर यांनी खाजगी विधेयक सादर केले होते. या विधेयकाद्वारे देशातील 14 वर्षाखालील मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे. यासाठी एचपीव्ही लस राष्ट्रीय स्तरावर मोफत उपलब्ध करून देण्याची ठोस मागणी करण्यात आली होती.
गर्भाशय मुखाचा कर्करोग हा भारतातील महिलांमध्ये आढळणाऱ्या प्रमुख कर्करोगांपैकी एक आहे. एचपीव्ही विषाणूमुळे होणाऱ्या या आजारावर प्रभावी प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरणाला जागतिक स्तरावर मान्यता आहे. संसदेत मांडलेल्या या विषयाकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देत अखेर देशव्यापी मोफत लसीकरण कार्यक्रम जाहीर केला आहे. या निर्णयामुळे देशातील ग्रामीण व शहरी भागातील 1 कोटी 25 लाख मुलींना प्रतीवर्ष मोफत आणि सुरक्षित आरोग्य संरक्षण उपलब्ध होणार असून, महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.
