धाराशिव (प्रतिनिधी)-  सर्वसामान्य ग्रामस्थांना शासनाच्या सेवा वेळेत व घरपोच पद्धतीने उपलब्ध करून देणे हा लोकसेवा हक्क आयोगाचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रतिपादन लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त किरण जाधव यांनी केले.

आयुक्त श्री. जाधव यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देऊन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत महसूल शाखेमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सेवांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती पाटील,उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत १५० दिवसांच्या कार्यालयीन मूल्यमापनात जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव यांना राज्यात तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल आयुक्तांनी जिल्हाधिकारी व सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.तसेच नागरिकांना तत्पर सेवा दिल्याबद्दल कळंब व परंडा तहसिल कार्यालय तसेच वाशी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ नुसार जाहीर सेवांची पूर्तता विहित कालमर्यादेत करणे संबंधित विभागासाठी बंधनकारक असून, विलंब झाल्यास जबाबदारी निश्चित केली जाईल,असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.सेवा अर्जांची वेळेत नोंद, निर्धारित मुदतीत निकाली काढणे, अपील प्रक्रिया व पारदर्शक माहिती देण्याबाबत काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना श्री.जाधव यांनी दिल्या.

जिल्हा प्रशासनाने विकसित केलेल्या व्हॉट्सॲप चॅटबोट व ‘तुळजाई’ तक्रार नोंदणी ॲपच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल आयुक्तांनी विशेष कौतुक केले.जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी या डिजिटल उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.या बैठकीला विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 
Top