तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील पांगरदरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरदरवाडी मधील शैक्षणिक गुणवत्ता व अनियमित कारभाराबाबत आलेल्या गंभीर तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषद धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी अचानक धडक भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. भेटीदरम्यान आढळलेल्या प्रकारांवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले.
शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी केलेल्या लेखी तक्रारीत काही शिक्षक वर्गावर नियमित न जाता कार्यालयात बसून मोबाईल वापरणे, विना रजा गैरहजर राहणे, परस्पर रजा ॲडजस्ट करणे, तसेच शाळेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून अस्वच्छता पसरवणे अशा प्रकारांचा उल्लेख केला होता. प्रत्यक्ष पाहणीत हजेरी पत्रकात खाडाखोड झाल्याचेही निदर्शनास आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. घोष यांनी संबंधित शिक्षकांची खरडपट्टी काढली. दरम्यान, प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने काम करणाऱ्या शिक्षकांचे त्यांनी कौतुक करत, “चुकी करणाऱ्यांवर कारवाई होईल; पण चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी प्रशासन ठामपणे उभे राहील,” असेही सांगितले.
यावेळी शिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, उपशिक्षणाधिकारी पिकवणे, गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, केंद्रप्रमुख कल्याण बेताळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम शेळके, उपसरपंच सोमनाथ शिंदे, किरण शिंदे, गणेश गायकवाड यांच्यासह पालक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निलंबनाची मागणी
शाळेच्या अनियमित कारभारामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. संबंधित तीन शिक्षकांविरोधात आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
श्रीराम शेळके, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, पांगरदरवाडी
