धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यात सध्या दिवसेंदिवस तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या खाली येत असून सर्वदूर थंडी वाढल्याचे चित्र आहे.उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्याने राज्यात कडाक्याची थंडी जाणवत असून धाराशिव जिल्ह्यातदेखील तीव्र थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत. उत्तरेकडील वाढत्या शीत लहरींमुळे पुढील काही दिवस राज्यात कडाक्याची थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान,थंडीची लाट अथवा शीत लहर ही एक हवामानाशी संबंधित घटना असून,यामुळे विशिष्ट क्षेत्रातील तापमान सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात घटते.हिवाळ्यात प्रामुख्याने उद्भवणारे आजार व त्यांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
श्वसनसंस्थेशी संबंधित आजार
थंड हवेमुळे श्वसनमार्गावर मोठा परिणाम होतो.यामध्ये सर्दी,खोकला, फ्लू यांसारखे आजार उद्भवतात.फ्लूमध्ये तापासोबत अंगदुखी,डोकेदुखी व थकवा जाणवतो.घसा खवखवणे तसेच दमा असलेल्या रुग्णांसाठी हिवाळा अधिक त्रासदायक ठरतो.थंड हवेमुळे फुफ्फुसांच्या नळ्या आकुंचन पावतात.
त्वचेच्या समस्या
हवेतील ओलावा कमी झाल्यामुळे त्वचेवर विपरीत परिणाम होतो.त्वचा कोरडी पडणे,ओठ फाटणे, एक्झिमा व सोरायसिस यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
हाडे व सांधेदुखी
कमी तापमानामुळे सांध्यांमधील लवचिकता घटते व रक्ताभिसरण मंदावते.परिणामी गुडघे,कंबर तसेच हात-पायांच्या सांध्यांमध्ये वेदना होऊ शकतात.
हृदयविकार
हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो.
वाढत्या शीत लहरींमुळे शरीराच्या तापमानावर विपरीत परिणाम होऊन विविध शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात.गरोदर महिला,लहान बालके,वयोवृद्ध नागरिक तसेच श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त व्यक्ती हे घटक अधिक जोखमीचे असल्याने त्यांच्यावर थंडीचा परिणाम अधिक होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांना त्यांच्या संबंधित कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याबाबत जिल्हास्तरावरून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.वाढत्या थंडीपासून नागरिकांनी स्वतःचा बचाव करून सुरक्षित राहण्यासाठी पुढीलप्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे.
वाढत्या थंडीत घ्यावयाची काळजी
पुरेसे उबदार कपडे परिधान करावेत. एकावर एक असे अनेक कपडे घालणे उपयुक्त ठरते.शरीर कोरडे ठेवावे;ओले कपडे असल्यास त्वरित बदलावेत,जेणेकरून शरीरातील उष्णता कमी होणार नाही. हातमोज्यांपेक्षा संपूर्ण हात झाकतील असे मोजे वापरावेत,त्यामुळे अधिक उब मिळते.शीत लहर असताना शक्यतो घरातच राहावे व थंड वाऱ्यापासून बचावासाठी प्रवास मर्यादित ठेवावा.घरातील वृद्ध व लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. रेडिओ,दूरदर्शन तसेच वृत्तपत्रांमधून हवामानविषयक ताज्या बातम्यांची माहिती घ्यावी.नियमितपणे गरम पेय घ्यावे; मद्यपान करू नये,कारण त्यामुळे शरीराचे तापमान कमी होते.
थंडीमुळे शरीराचा कोणताही भाग मऊ अथवा मलूल होणे,बोटे,पायाची टोकं,कानाची पाळी किंवा नाकाच्या शेंड्यावर निस्तेजपणा,पांढरटपणा किंवा पिवळेपणा जाणवणे ही लक्षणे आढळल्यास तात्काळ लक्ष द्यावे. थंडीचा चटका बसून भाजल्यासारखे झाल्यास त्या भागाला चोळू नये, अन्यथा अधिक हानी होऊ शकते. थंडीचा चटका बसलेला भाग सहन होईल इतक्या गरम पाण्यात बुडवावा.थंडीने अंग कापणे हे शरीराचे तापमान कमी होत असल्याचे पहिले लक्षण असून त्याकडे दुर्लक्ष करू नये.थंडीमुळे कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या उद्भवल्यास त्वरित नजीकच्या शासकीय दवाखान्यात तपासणी करून घ्यावी.
वाढत्या थंडीत जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वतःचा तसेच आपल्या कुटुंबीयांचा बचाव करून सुरक्षित राहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी केले आहे.