धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील येडशी येथे 16 डिसेंबर 2025 रोजी सकाळी ऐनवेळी प्राप्त झालेल्या तक्रारीमुळे प्रशासनाने तत्काळ हालचाल करत ठीक सकाळी 11 वाजता होऊ घातलेला बालविवाह यशस्वीपणे रोखला. एका मुलीचे बालपण आणि उज्वल भविष्य वाचविण्यात प्रशासनाला मिळालेले हे यश समाजात सकारात्मक संदेश देणारे ठरले आहे.
प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे तसेच जिल्हा समन्वयक विकास चव्हाण यांच्या मार्गदर्शनात धाराशिव तालुक्यातील येडशी गावात ही कारवाई करण्यात आली.बाल संरक्षणाच्या दृष्टीने संवेदनशीलता दाखवत संबंधित यंत्रणांनी तात्काळ पावले उचलली.
या कारवाईत बाल संरक्षण कक्षाच्या प्रज्ञा बनसोडे (सामाजिक कार्यकर्ता),चाईल्ड हेल्पलाईन कक्षातील अभय काळे (केस वर्कर),श्रीमती पल्लवी पाटील (सुपरवायजर) यांच्यासह पोलीस विभाग, ग्रामसेवक,अंगणवाडी सुपरवायजर, अंगणवाडी सेविका,सरपंच तसेच गाव ग्राम बाल संरक्षण समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून बालविवाह प्रतिबंध केला. कारवाईदरम्यान पालकांचे समुपदेशन करण्यात आले.बालविवाहामुळे मुलीच्या आरोग्य,शिक्षण व भविष्यातील आयुष्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांची जाणीव करून देण्यात आली.यानंतर पालकांकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले.
वेळीच मिळालेली माहिती,प्रशासनाची तत्परता आणि विविध यंत्रणांमधील समन्वय यामुळे एका निष्पाप मुलीचे बालपण सुरक्षित राहिले. बालविवाहासारख्या सामाजिक अपप्रथांना रोखण्यासाठी समाजानेही सजग राहावे व कोणतीही शंका असल्यास तत्काळ प्रशासन किंवा चाईल्ड हेल्पलाईनशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.