तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूरच्या नगरपरिषद निवडणुकीने यंदा विकासाचे मुद्दे पूर्णपणे मागे पडत “लक्ष्मीदर्शन” हा मुख्य अजेंडा ठरल्याची शहरात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. पैशाच्या मोहापुढे सुशिक्षित मतदारही वाहून गेल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत की, संपूर्ण शहरभर “सुशिक्षित की अशिक्षित?” हा प्रश्नच गाजतोय. त्यामुळे 21 डिसेंबरचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीच्या प्रचारयंत्रणेचा केंद्रबिंदू यावेळी विकास नव्हे तर धनशक्ती ठरली अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोमानं रंगत आहे. काही मतदार तर असेही म्हणत असल्याचे बोलले जाते की, लक्ष्मीचे दर्शन झाल्याशिवाय मतदान केंद्राकडे पावलेच पडत नव्हती. बहुतांश उमेदवार तेच होते मात्र त्यांचे पक्ष बदललेले होते. या लढतीत आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागले होते. अंतिम टप्प्यात झालेल्या अतिरिक्त आर्थिक हस्ताक्षेपामुळे संपूर्ण समीकरणच बदलून गेले. कोणत्या बाजूने निकाल लागेल याचा अंदाज बांधणे अत्यंत कठीण बनले आहे. सुरुवातीपासूनच रंगतदार असलेली लढत आता डिसेंबर 21 च्या निकालामुळे आणखीच उत्कंठावर्धक बनली आहे. शहरात सध्या हाच मोठा प्रश्न आहे की, निकाल कोणाच्या बाजूने झुकतो, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.