धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषद व नगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच संभाव्य आंदोलनात्मक कार्यक्रमांचा विचार करून,जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू केला आहे.हा आदेश 2 डिसेंबर 2025 रोजी रात्री 1 वाजेपासून ते 14 डिसेंबर 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरून) लागू राहणार आहे.

निवडणुकांदरम्यान विविध पक्ष, संघटना, गट यांच्या कार्यक्रमामुळे मोठी गर्दी होण्याची,पक्षांतर, गटबाजी,आरोप-प्रत्यारोप वाढण्याची आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

याशिवाय जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती व घरांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे पिकविमा,नुकसानभरपाई,ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागण्यांसाठी अचानक धरणे,मोर्चे, उपोषण,आत्मदहन,तालठोको, रास्तारोको इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.या सर्व पार्श्वभूमीवर अपर जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी करताना खालील बाबींवर मनाई केली आहे:

प्रतिबंधात्मक आदेशानुसार पुढील बाबीस मनाई करण्यात आली आहे.यामध्ये शस्त्र, सोटे,काठी,तलवार,बंदूक जवळ बाळगणे. शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील अशी लाठ्या,काठ्या किंवा तत्सम वस्तू बाळगणे.कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ ठेवणे.दगड,क्षेत्रपणास्त्रे, फोडणी किंवा फेकावयाची उपकरणे तयार करणे किंवा बाळगणे.आवेशी भाषणे, अंगविक्षेप,विडंबन,असभ्य वर्तन,प्रक्षोभक कृती किंवा सामाजिक सलोखा व सुरक्षिततेस बाधा आणणाऱ्या वस्तू, चित्रफलक जवळ बाळगणे. सार्वजनिकरीत्या घोषणा देणे,गाणी म्हणणे,वाद्य वाजविणे किंवा संविधानविरोधी किंवा देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणारी कृत्ये करणे.व्यक्तींच्या किंवा शवांच्या प्रतिमा प्रदर्शित करणे.पाच किंवा अधिक व्यक्तींच्या जमावास परवानगीशिवाय एकत्र येणे किंवा मिरवणूक/मोर्चा काढणे.या बाबींचा समावेश आहे.

 
Top