धाराशिव (प्रतिनिधी)- पुणे येथील कात्रज परिसरातील संपर्क कार्यालयात शिवसेना (शिंदे गट) नेते, माजी पालकमंत्री प्रा. डॉ.तानाजीराव सावंत यांची भाजप पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. ही भेट म्हणजे 140 कोटींच्या रस्त्यांच्या कामावरून भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्यात निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी आहे का? असे बोलले जात आहे.
या भेटीत भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य, तसेच नेते नितीन काळे उपस्थित होते. मात्र, ही भेट केवळ सदिच्छा म्हणून घेतली का, की धाराशिवच्या 140 कोटींच्या रस्ता निधी व निविदा वादाशी संबंधित काही गुप्त चर्चाही झाल्या, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. माजी पालकमंत्री तथा भूम-परंडा-वाशीचे आमदार सावंत यांनी यांच्या काळात विशेष लक्ष घालून मंजूर घेतलेल्या 140 कोटींच्या निधीतील कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. गेल्या 18 महिन्यापासून या कामावर शिवसेना उबाठा गट यांनी आक्षेप घेतला. तर भाजप ने या कामावर स्थगितीच आणली. त्यामुळे धाराशिव शहरासह जिल्ह्यातील विकास कामे ठप्प झाली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात पालकमंत्री सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना लवकरच विकास निधीवरील स्थगिती उठविण्यात येईल यासंदर्भात ग्रामविकास मंत्री गोरे व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले होते. दोन आठवड्यापूर्वी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून विकास कामांवरील स्थगिती उठविल्याचे जाहीर करीत लवकरच कामे सुरू होतील असे सांगितले होते. परंतु त्यानंतर आलेल्या काही तक्रारीवरून या कामांमध्ये अनियमितता असल्याचा ठपका ठेवून विद्यमान पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी संबंधित निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याचे आदेश दिले होते.
एककडे शहरातील अंतर्गत रस्त्याच्या स्थगितीच्या मुद्द्यावरून पालकमंत्री प्रताप सरनाईक व भाजप आमदार राणा पाटील हे एकमेकांसमोर उभा टाकलेत. त्यातच आता भारतीय जनता पार्टी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी तानाजी सावंत यांच्याबरोबर येणाऱ्या नगरपालिका निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेऊन हात मिळवण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना अशी चर्चा या भेटीच्या निमित्ताने केली जात आहे.
