धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते सांजारोड भवानी चौक या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. कायम रहदारी असलेल्या या मार्गाच्या कामाला एमएसआयडीसी अंतर्गत हायब्रीड ॲन्युटीमधून मंजुरी मिळालेली असून धाराशिव शहराची खड्डेमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.

धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौक, आर्य समाज चौक, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक या मार्गावर कायम रहदारी असते. याच मार्गावर बहुतांश शाळा आणि कॉलेज आहेत. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत नेहमी विद्यार्थ्यांची वर्दळ असते. त्याचबरोबर या मार्गावर व्यापारी संंकुल आहेत. या रस्त्याची अत्यंत दूरवस्था झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता होती. त्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सतत पाठपुरावा करून निधी मंजूर करवून घेतला. त्यानंतर शुक्रवारी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय आता दूर होणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमास शिवसेना जिल्हा संघटक सुधीर पाटील, धाराशिव शहरप्रमुख आकाश कोकाटे यांच्यासह शिवसेनोचे प्रमुख पदाधिकारी, महिला पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top