धाराशिव (प्रतिनिधी)- अभय योजनेंतर्गत मालमत्ता कर दंडात सुट मिळण्याचे धोरण धाराशिव नगर पालिकेने जाहीर केले होते. ही मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत असल्यामुळे शहरातील बहुसंख्य नागरिकांनी दंडात सुट याचा लाभ घेत 1 कोटी रूपयांच्या जवळपास मालमत्ता कर भरला आहे. त्यामुळे 31 ऑक्टोबरनंतर अभय योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक अभिजीत काकडे यांनी धाराशिव नगर परिषदेकडे केल्यामुळे एक आठवड्याची मुदत वाढवली आहे.
गेल्या काही वर्षापासून नगरपालिका प्रशासन आणि नागरिकांत कर मुल्यांकनावरून मोठा वाद सुरू आहे. नगरपालिकेने मोठ्या प्रमाणात कर आकरल्याचा आरोप केला जात आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्यात आली होती. मात्र या समितीने आपले कामकाज पूर्ण केले नाही. दरम्यान, नगरपालिकेने लादलेल्या करात कपात होईल, या आशेने अनेकांनी आतापर्यंत कर जमाकेमला नव्हता. यामुळे अनेकांच्या थकबाकीत मोठी वाढ झाली आहे. आता शासनाने अभय योजनेअंतर्गत थकीत मालमत्ता करावरील दंड माफीसाठी योजना सुरू केली आहे. 19 मे 2025 च्या नगर विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार एकरकमी थकबाकी जमा केल्यास त्यावरील आकारण्यात आलेल्या दंडात 50 टक्क्यांपर्यत किंवा त्यापेक्षा अधिक माफी मिळू शकते. सुरूवातीला 31 ऑक्टोबर ही कर भरण्याची अंतिम तारीख असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, कराचा भरणा करण्यासाठी आणि या योजनेतून लाभासाठी आणखी एक आठवड्याची मुदत देण्यात आली. मुदतवाढीच्या मागणीसाठी माजी नगरसेवक अभिजीत काकडे यांनी निवेदन दिले.