नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्गचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अशोक जगदाळे यांनी आपल्या कार्यकर्त्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शहरात कमकुवत झाला असून, आता शहरात काँग्रेसला नवा उत्साह प्राप्त झाला आहे. दरम्यान येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसकडून अशोक जगदाळे हेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे टिळक भवन येथे काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये अशोक जगदाळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. अशोक जगदाळे यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशामुळे तुळजापूर तालुक्यामध्ये काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशोक जगदाळे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेचे उमेदवारी घेऊन जवळपास पहिल्याच टप्प्यात 35 हजार मतदान घेऊन सत्ताधाऱ्यांना घाम फोडला होता. दरम्यान 2016 च्या नगरपालिकेच्या निवडणुकीत अशोक जगदाळे यांनी त्यांची बहीण रेखाताई जगदाळे यांना नगराध्यक्षपदी निवडून आणून एकहाती सत्ता नगरपालिकेत काबीज केली होती. त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष नितीन कासार, माजी उपनगराध्यक्ष शरीफ शेख, माजी नगरसेवक अमृत पदाले, ताजुद्दीन सावकार, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष संजय बेडगे, नवल जाधव, माजी नगरसेविका सुमन जाधव, मास्टर टेलर, अमोल सुरवसे, दत्ता राठोड, अलीम शेख यांच्या सह अनेकांचा काँग्रेस प्रवेश झाला आहे.
