धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्याने इच्छुकांच्या नावाची चर्चा राजकीय फडात रंगू लागली आहे. रूईभर (ता. धाराशिव) येथील सुमंत कोळगे या सुशिक्षित तरूणाला बेंबळी जिल्हा परिषद गटातून आखाड्यात उतरण्याचा चंग दस्तुरखुद्द ग्रामस्थ व तरूणांनी बांधल्याचे म्हटले जात आहे. मुळचे रूईभर येथील सुमंत कोळगे यांची पुणे येथे कंपनी असून अनेक तरूणांना त्यांनी रोजगार दिला आहे. गावासह बेंबळी मतदारसंघाच्या विकासासाठी कोळगे यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी आता केली जात आहे. कोणत्या पक्षाकडून ते निवडणूक लढविणार? हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, कोळगे यांचे अचानक नाव चर्चेत आल्याने इच्छुकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
धाराशिव तालुक्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा आणि लक्षवेधी मतदार संघ म्हणून बेंबळी जिल्हा परिषद मतदार संघ ओळखला जातो. या मतदार संघातील आजपर्यंतच्या लढती या अत्यंत चुरशीच्या झाल्या आहेत. गतवेळी हा मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होता. तर यंदा सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी राखीव झाल्याने मोठी चुरस वाढणार आहे. या मतदारसंघात रूईभर, बेंबळी, बरमगाव, वाडी, आंबेवाडी, गौडगाव, अनसुर्डा, विठ्ठलवाडी, शिवाजीनगर, महादेववाडी, खामसवाडीसह पंचगव्हाण या गावांचा समावेश आहे. या मतदारसंघात उमेदवारी मिळावी, यासाठी भावी जिल्हा परिषद सदस्यांनी आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी चालविली आहे. अनेक इच्छुकांची नावे उमेदवारीसाठी समोर केली जात आहेत. मात्र रूईभर (ता.जि. धाराशिव) येथील सुसंस्कृत आणि उद्योजक म्हणून ओळख निर्माण केलेले सुमंत कोळगे यांचे नाव नागरिकांमधूनच चर्चेले जात आहे. कोळगे हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून येत असून, त्यांनी आपल्या परिस्थितीमुळे पुणे गाठले होते. या ठिकाणी जाऊन त्यांनी सुरूवातीला मिळेल, ते काम केले. त्यानंतर त्यांनी पुणे येथील आयटी पार्कमध्ये बिझनेस मित्रा कॅपिटल नावाने जॉइंट व्हेंच्युअर कंपनी स्थापन केली. सध्या या कंपनीत जवळपास 80 तरूण कार्यरत आहेत. रूईभर सारख्या ग्रामीण भागातून येऊन त्यांनी पुणे येथे स्व: मालकीची कंपनी स्थापन करून यशस्वी सुरू ठेवली आहे. मात्र बेंबळी जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने श्री कोळगे यांनी निवडणूक लढवावी, अशी इच्छा तरुणांसह नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. अनेक तरुण श्री कोळगे यांना संपर्क करत असून आपण मतदार संघाच्या विकासासाठी मैदानात उतरण्याची मागणी करत आहेत. तरूण आणि माझ्या माय-बाप जनतेची तशी इच्छा असेल तर आपण जनसेवेसाठी निवडणूक लढवू, असे कोळगे यांनी सांगितले.
युवा विचार लढणार, परिवर्तन घडणार!
या घोषवाक्याने त्यांनी बेंबळी जिल्हा परिषद मतदारसंघात युवक, शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य जनतेमध्ये नव्या आशेचा किरण निर्माण केला आहे. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे सत्तेच्या राजकारणात स्थिरता आणणारा, पण नव्या वाटा दाखवणारा एक विचारमंथन सुरू झाले आहे.
बेंबळी मतदारसंघासाठी नव्या विचारांची गरज”
“ही निवडणूक सत्तेसाठी नव्हे, तर बेंबळी मतदारसंघाच्या विकासासाठी आहे. आम्ही गावपातळीवरील प्रत्येक प्रश्नाला प्राधान्य देऊ. परिवर्तन ही घोषणा नाही, ती आमची बांधिलकी आहे. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासह नागरिकांच्या विविध अडीअडचणी सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.
सुमंत कोळगे, इच्छुक उमेदवार
